मालेगाव महापालिका निवडणूक

येथील महापालिकेच्या येत्या २४ मे रोजी होणाऱ्या ८४ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी २१९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण ३३८ अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या चार दिवसांमध्ये केवळ ११९ अर्ज दाखल झाले होते. परंतु अर्ज दाखल करण्यास मुदत संपण्यास एकच दिवसाचा अवधी शिल्लक राहिल्याने शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने आपल्या अधिकृत अमेदवारांची नावे घोषित करण्यात आघाडी घेतली असून पक्षातर्फे आतापर्यंत ७६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ऊर्वरित आठ उमेदवारांच्या नावांची शनिवारी घोषणा करण्यात येणार आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी अन्य पक्षांना उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. सेना,भाजप या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच भाजपमध्ये पक्षांतर्गत मतभेद उफाळून आल्याने सर्वाचे समाधान करत नावे नक्की करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते. या शिवाय निवडणूक डावपेचांचा भाग म्हणूनही उमेदवारांची घोषणा शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर न करण्याची भूमिका काही पक्षांनी घेतल्याचे दिसते. त्यामुळे भाजप, सेना, राष्ट्रवादी, जनता दल व एमआयएम या साऱ्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा शनिवारी होणार आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरतांना विविध पक्षीय उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून तयारी

प्रशासनातर्फे प्रभागांनुसार चार ठिकाणी निवडणूक अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी चार स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरूवातीला तुरळक स्वरूपातील उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु शुक्रवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी संपत असल्याने या दिवशी आणखी गर्दी होणार असून त्यादृष्टीने प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली आहे.