scorecardresearch

“अजानसाठी भोंगा वापरणार नाही, पण साईंची काकड आरती भोंग्यांवर करू द्या”; शिर्डीत मुस्लीम समुदायाची मागणी

मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत साई मंदिरातील काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.

राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन पुकारलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या ३ मे च्या अल्टिमेटमनंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक ठिकाणी भोंगे बंद करण्यात आले. शिर्डीमध्येही मशिद आणि मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे साई मंदिरातील पहाटेच्या काकड आरतीसाठी लाऊडस्पीकरवर वापरण्यात आले नाही. दरम्यान, आता मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत साई मंदिरातील काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

साई मंदिरावर भोंगे लावण्यात आले असून त्यातून दररोज काकड आरती आणि शेजाआरती होते. परंतु मनसेच्या आक्रामक भूमिकेनंतर मशिदीसह मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत आम्ही पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणार नाही, परंतु साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लीम समुदायातील काही लोकांनी प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं आहे.

आंदोलनानंतर राज्यात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न राज्यासह मुंबईतही करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी मनसे सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  मनसेने घेतलेल्या पवित्र्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मुंबईतही पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Muslim community asks permission to use loudspeaker for kakad aarti at sai temple shirdi hrc

ताज्या बातम्या