सोलापूर : इस्त्रायल-हमासदरम्यान सुरू झालेल्या युध्दाला तीन आठवडे होत असताना इस्त्रायलने प्रचंड बाॕम्बवर्षाव करून गाझापट्टीतील निष्पाप पॕलेस्टिनींना लक्ष्य बनविले आहे. या भीषण संकटात पॕलेस्टिनींचे जीवित आणि मालमत्तेचे रक्षण होण्यासाठी सोलापुरात मुस्लीम समाजाच्यावतीने सर्वश्रेष्ठ अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. याचवेळी अमेरिकन आणि इस्त्रायलीन उत्पादनांवर बहिष्कार घालून देशी उत्पादने खरेदी करण्याची हाक देण्यात आली.

सायंकाळी सूर्यास्तानंतर सिध्देश्वर  पेठेतील एम. ए. पानगल प्रशालेच्या मैदानावर अर्थात ऐतिहासिक जुन्या आलमगीर ईदगाह मैदानावर मगरीब नमाज पठणानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. शहर काझी मुफ्ती सय्यद अहमदअली काझी यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या प्रार्थनेत हजारो मुस्लीम सहभागी झाले होते. भारत देशाने नेहमीच पॕलेस्टिनींना पाठिंबा दिला आहे. सध्याच्या महाभयंकर युध्दातही भारत देश पॕलेस्टिनींच्या बाजूने उभा राहत त्यांना मोठी मदतही पाठविली आहे. ही बाब दर्शविणारे फलकही ईदगाहवर झळकावण्यात आले होते.

हेही वाचा >>> ‘..मी पुन्हा येईन!’ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा महाराष्ट्रने पोस्ट केला ‘तो’ व्हिडीओ

पॕलेस्टिनीवर इस्त्रायलने वर्चस्व गाजविण्यासाठी नेहमीच युध्दखोर धोरण आखले आहे. त्यास वेळोवेळी  अमेरिकेची साथ लाभली आहे. इस्त्रायलच्या बाॕम्बवर्षावात हजारो पॕलेस्टिनी मुले, महिला आणि वृध्द मृत्युमुखी पडत असून तेवढेच जायबंदी होत आहेत. त्यांची पाणी व अन्नावाचून उपासमार होत आहे. इस्त्रायलचे हे कृत्य मानवताविरोधी असल्याचे मुफ्ती अहमदअली काझी यांनी प्रार्थनेप्रसंगी नमूद केले.

मुस्लीम समुदायाविरूध्द जगात सर्वत्र द्वेषभावना भडकावली जात असून अशाप्रसंगी मुस्लिमांनी पवित्र कुराण आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीच्या मार्गावरूनच संयमाने आणि शांततेने वाटचाल करावी, भावनेच्या भरात चुकीचे पाऊल कोणत्याही परिस्थितीत उचलू नये. ती इस्लामची शिकवण नव्हे, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी झालेल्या सामूहिक प्रार्थनेत परमात्म्याला शरण जाऊन याचना करताना प्रत्येकाने आसवे गाळली. भारतातही राजकीय स्वार्थापोटी जातीयद्वेष पसरविण्याचा प्रयत्न वारंवार होत असून त्यापासूनही मुस्लीम समाजाने सावध राहावे. अशा कोणत्याही जातीय शक्तींना बळी पडू नये, असेही आवाहन शहर काझींनी केले.

हेही वाचा >>> निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर नीलेश राणेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “फडणवीसांशी बोललो, मी आता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चाऐवजी प्रार्थना पॕलेस्टिनींच्या समर्थनार्थ सोलापुरात मुस्लीम समाजाने मोर्चा काढण्यिचे ठरविले होते. परंतु पोलीस प्रशासनाने मोर्च्याला परवानगी नाकारली. त्यामुळे ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना केली गेली. दरम्यान, मुस्लीम समाजाच्या मोर्च्याला काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता.