वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबर लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी गाठीभेटीही झाल्या होत्या. वबिआला अधिकृतरित्या महाविकास आघाडीत सामीलही करून घेतले होते. परंतु, जागा वाटपादरम्यान अंतर्गत वाद झाल्याने वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रेची भूमिका स्वीकारली. तसंच, ठाकरे गटावर टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपही जाहीर केले आहे. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे.
“महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. जर भाजपाप्रमाणे महाविकास आघाडीही मुस्लिम उमेदवार देत नसेल तर दोघांमध्ये फरक काय?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसंच, “महाविकास आघाडीला मुस्लीम मते पाहिजे, पण मुस्लीम उमेदवार नको”, असा गंभीर आरोपही केला.
वंचित बहुजन आघाडीने कुणबी मराठा ३, मराठा २, बौद्ध ३, मुस्लिम ३, धनगर २, बंजारा २, आदिवासी १, लिंगायत १, माळी २, तेली १, मातंग १, जैन १ असे एकूण २२ सर्वजातीय, सर्वधर्मीय उमेदवार दिलेले आहेत.
हेही वाचा >> वंचित आघाडीत महिला‘ वंचित’
काही ठिकाणी उमेदवारी, काही ठिकाणी पाठिंबा
शिरुरमध्ये मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितने ऐनवेळी रद्द केली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील केमसिंग पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. वंचितने ७ मतदारसंघात इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामध्ये अमरावतीत आंबेडकर यांचे सख्खे बंधू आंनदराज यांना, रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना, नागपुरातून काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना, बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना, कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज आदींना वंचितने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
हेही वाचा >> वंचित बहुजन आघाडी अन् महाविकास आघाडीच्या युतीचे काय झाले? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…
वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये उमेदवारांच्या नावापुढे त्याची जात लिहिलेली आहे. विशेष बाब म्हणजे वंचितने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेसच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात मात्र काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे.