Nana Patole : महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपा महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याचंही बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अनेक लोक, जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असल्याचं विधान केलं आहे. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा फेटाळून लावत आमचे सर्व खासदार आमच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य

नाना पटोले काय म्हणाले?

“चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं? हे फार गांभीर्याने घेऊ नका. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचे सर्व खासदार आमच्याबरोबर आहेत. ऑपरेशन लोटसच्या चर्चांवर आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महायुतीच्या सरकारची हालत काय आहे? हे या हिवाळी अधिवेशनात दिसेल”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

“महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार आम्हाला भेटतात. त्यांचं दुःख मांडत असतात. काँग्रेस नेतृत्व निवडून आलेले आमदार, खासदार यांच्याशी संपर्क करत नाहीत. काँग्रेस नेतृत्वाचं दुर्लक्ष आहे. काही लोक अस्वस्थ आहेत, त्यामुळे पुढे पाहू काय होतं. महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही ऑपरेशन लोटस वगैरे राबवत नाही. त्याची गरजच नाही. शिवाय त्यांच्यातले लोक फुटल्यावर ते ईडी सीबीआयच्या नावे खापर फोडतात. आम्ही ईडी आणि सीबीआयकडे कधी गेलो नाही. तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात”, असं बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राज्याच्या राजकारणात काही येण्यासाठी इच्छुक’

“आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष स्वागत करतो. जेव्हा कुणी पक्षात येतं किंवा जे अस्वस्थ प्रतिनिधी येणार आहेत त्यांना हे वाटतं की विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोक विकसित महाराष्ट्राला साथ द्यायची आहे. त्यामुळे आमच्या संपर्कात काही खासदार आणि आमदार आहेत. काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आमच्याशी चर्चा करत आहेत. काही राज्याच्या राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही आज काही फार बोलणार नाही”, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.