उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारने माझ्यावर गुन्हे दाखल करुन मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या आरोपानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.जनतेच्या मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधित आरोप केले, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, “आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मागच्या काळात ते विरोधी पक्षनेते होते. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना प्रत्यय आला की, त्यांना महाविकास आघाडीच्या काळात तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. ते स्वत: विधानसभेत ‘मी बदला घेतला’ असं सांगतात. भाजपा जनतेला जे स्वप्न दाखवून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आली. आज त्याच मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत.”
“बेरोजगारीबद्दल का बोललं जात नाही? आम्ही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊ, असं गाजर त्यांनी (भाजपा) २०१४ ते २०१९ या काळात दाखवलं होतं. आता सत्तेत आल्यानंतर तेच गाजर पुन्हा दाखवलं जातंय. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतायत, त्यावर फडणवीस का बोलत नाहीत? हे मला कळत नाही. काल मी त्यांची एक मुलाखत ऐकली. मला वाटलं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, बेरोजगारीवर, महागाईवर बोलतील, पण ते स्वत:बद्दलच बोलत होते. सत्ताधाऱ्यांनी स्वत:पेक्षा जास्त जनतेची काळजी करावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असा टोला नाना पटोलेंनी लगावला.
“जनतेचे मूळ मुद्दे कसे वळवता येतील आणि त्याच्या आधारावर मविआ सरकार मलाच कसं तुरुंगात टाकत होतं, असा आव आणण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो,” अशी टीका पटोले यांनी केली.
फडणवीसांनी नेमके आरोप काय केले?
“महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं. मी काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा. जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिले होते,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
