Nana Patole Suspended for a Day: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दुसऱ्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे काँग्रेस आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून शेतकऱ्यांचा अपमान झाल्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी नाना पटोलेंनी केली होती. निलंबनानंतर नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्ताधारी भाजपावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
“राज्यातील भाजपा-महायुती व केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारला माज आला आहे. या सरकारचं खरं रूप आता समोर आलं आहे. यांचे आमदार, कृषीमंत्री शेतकऱ्याला भिकारी समजतात. शेतकऱ्याच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात. सगळं हे घेऊन देतात असं सांगतात. २०१४ च्या आधी हा लोणीकर उगाच फिरत होता. त्याला दोन बायका होत्या. जो शेतकऱ्यांबद्दल बोलेल, त्याला सभागृहातून निलंबित करायचं आणि जे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना सन्मानानं वागवायचं असं हे सरकार आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
हे लोक सत्तेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी आलेत का – नाना पटोले
“हे लोक सत्तेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी, त्यांना आत्महत्या करवण्यासाठी आले आहेत का? यापेक्षा असंवैधानिक काय असेल? मोदी यांचा बाप असू शकेल, तो आमच्या शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. मोदी शेतकऱ्यांना मारण्यासाठी सत्तेत आला हे आम्ही बोलणार. जेव्हापासून मोदींचं सरकार देशात आलंय, तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यांचं उत्पन्न हे दुप्पट करणार होते. पण आता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही”, अशा शब्दांत नाना पटोलेंनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं.
“रोज निलंबित केलं तरी थांबणार नाही”
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून रोज निलंबित केलं तरी थांबणार नसल्याचा निर्धार नाना पटोलेंनी यावेळी व्यक्त केला. “भाजपा शेतकरीविरोधी आहे. आज महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. पिकं नाहीशी झाली आहेत. हे लोक कर्जमाफी करत नाहीत. पीकविमा बंद करून टाकला. आम्ही सरकारविरोधात रोज आवाज उठवू. एक काय, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही उद्या पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. जोपर्यंत लोणीकर व राज्याच्या कृषीमंत्र्यांवर कारवाई होत नाही आणि मुख्यमंत्री शेतकऱ्यांची माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका
“निलंबनासाठी हे सरकार कारणं काहीही लावू शकतं. सरकारमध्ये थोडी जरी धमक असती, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असता आणि लोणीकर व कृषीमंत्र्यांनी ज्याप्रकारे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान केला, त्यांच्यावर कारवाई केली असती. शेतकऱ्यांची माफी मागितली असती. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचलो यावर मी अध्यक्षांचा अपमान केला, अध्यक्षांना धमकावलं असं रेकॉर्डवर आणलं. मीही अध्यक्ष राहिलो आहे. मलाही नियम माहिती आहेत. पण अध्यक्ष ज्यावेळी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, विरोधकांचा आवाज दाबतात, त्यावेळी विरोधकांना ही भूमिका घ्यावी लागते. मुख्यमंत्री म्हणतात मी अपमान केला आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी शेतकरी आहे. माझ्या शेतकऱ्यांचा अपमान कुणी करेल तर ते आम्ही सहन करणार नाही”, अशा शब्दांत नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं.
विरोधकांचा एक दिवसासाठी सभात्याग
दरम्यान, नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी एक दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवमानाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणीतरी निलंबित झालं आहे. आपण हा एक भयानक पायंडा पाडला आहे. महाराष्ट्राचं दुर्दैवं हे आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या नसून निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावर बसलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचनं न पाळता त्यांचा अपमान करून यांना सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपाने दाखवलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या निलंबनाचा निषेध म्हणून आम्ही आज एक दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.