नांदेड : येथून विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा २२ ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली. धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले.
गुर-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या सुमारास नांदेड विमानतळाचा मोठा विस्तार झाला होता. त्यानंतर नांदेडहून मुंबई व इतर ठिकाणी विमानसेवा सुरू झाली. दरम्यानच्या काळात शासनाने हे विमानतळ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. पण या कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे अलीकडेच हे विमानतळ रिलायन्सकडून परत घेऊन ते संचालनासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे देण्यात आले. विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेच्या वेळेसच एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवस सेवा सुरू ठेवल्यानंतर दि.२१ ऑगस्टला रात्री विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अचानक घेतलेल्या या निर्णयाचा फटका दुसऱ्याच दिवशी तिकीट बुकिंग असणाऱ्या ग्राहकांना तर बसलाच. परंतु दिवाळीपर्यंतच्या कार्यक्रमांच्या नियोजनावर त्याचा परिणाम झाला. विमानसेवा लवकर पूर्ववत व्हावी यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढत चालला होता. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा या विषयाचा आवर्जून उल्लेख केला. दरम्यान, रन-वे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून स्टार एअर कंपनीने १४ पासूनच्या तिकीट नोंदणीला सुद्धा सुरुवात केली आहे. असे असले तरी २० सप्टेंबरपूर्वी सेवा पूर्ववत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुक्तिदिनाचा मुहूर्त साधावा
पुढील आठवड्यात दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिदिनाचा मुहूर्त साधून स्टार एअरने नव्या जोमाने पूर्वीच्या सर्व मार्गावर तसेच फ्लाय ९१ या प्रस्तावात असलेल्या कंपनीनेही विमानसेवा सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्टार एअरने १४ सप्टेंबरपासून आगाऊ तिकीट नोंदणी सुरू केली आहे. पितृपक्षानंतर लगेचच पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या कालावधीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे विमानतळावरून सेवा लवकर सुरू होण्याची दाट चिन्हे आहेत.