नांदेड: काँग्रेस पक्षात २५ वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यातील पक्षसंघटनेवर एकहाती नियंत्रण राखणार्या खासदार अशोक चव्हाण यांना आता भाजपाच्या पक्षसंघटनेतही आपले नियंत्रण अपेक्षित असून पक्षाच्या जिल्ह्यातील तीन जिल्हाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत त्यांनी आपल्या समर्थकांची नावे पुढे रेटली आहेत, असे सांगण्यात आले.
भाजपाच्या ‘संघटन पर्वा’मध्ये प्रथम बूथ कमिट्यांच्या प्रमुखांची नावे निश्चित झाली. त्यानंतर नांदेडच्या तीन संघटनात्मक जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रांतील मंडळ अध्यक्षांची नावे मुंबईतील एका व्यापक बैठकीनंतर जाहीर झाली. त्या पाठोपाठ पक्षाच्या प्रदेश शाखेने जिल्हाध्यक्ष निवडीसाठी गेल्या आठवड्यामध्ये पाठविलेल्या निरीक्षकांनी येथे येऊन औपचारिकता पूर्ण केली. त्यांच्यामार्फत गेलेल्या नावांमध्ये चव्हाणांच्या समर्थकांचा लक्षणीय समावेश आहे.
खा.चव्हाण व त्यांच्या प्रमुख समर्थकांच्या भाजपा प्रवेशास अलीकडे सव्वा वर्ष पूर्ण झाले. पहिल्या वर्षभरात चव्हाण यांनी पक्षसंघटनेत लक्ष घातले नाही; पण आता सुरू असलेल्या प्रक्रियेत त्यांनी निरीक्षकांच्या उपस्थितीतील बैठकांना हजेरी लावत लक्ष घातले. नांदेड उत्तर जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख तसेच पक्षाचे जुने कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी इच्छा व्यक्त केली असताना, चव्हाण यांनी आपल्या समर्थकांपैकी गोविंदराव नागेलीकर, मुदखेडचे माजी नगराध्यक्ष सुनील शेटे आणि भोकर तालुक्याचे रामचंद्र मुसळे यांची नावे निरीक्षकांसमोर आणली. शेटे हे लिंगायत समाजातील असून ओबीसी प्रवर्गातील आहेत.
नांदेड महानगराध्यक्षपदासाठी चव्हाणांचे खास सहकारी, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव वरच्या क्रमांकावर असून त्यांनी महानगर भाजपाचे सुसज्ज कार्यालयही उभे केले आहे. याच पदावर पक्षाचे जुने कार्यकर्ते चैतन्यबापू देशमुख यांनीही दावा केला आहे, असे सांगण्यात आले.
भाजपाच्या नांदेड (द.) संघटनात्मक जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून त्यांतील तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. या जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी आ.राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांच्या नावाची चर्चा झालेली असताना खा.चव्हाण यांनी तेथे पवारांचे विरोधक असलेल्या श्रावण भिलवंडे यांच्यासह उद्योजक मारोतराव कवळे यांचे नाव स्पर्धेत आणले. पूनम पवार यांना पर्याय म्हणून जि.प.च्या माजी अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांचे नाव, तर राजेश पवार यांच्या एका पक्षांतर्गत विरोधकाने सुचविले.
खा.अशोक चव्हाण यांनी १९९९ ते २०२४ दरम्यान काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्षांसह प्रत्येक पदाधिकारी आपल्या पसंतीने नियुक्त केला होता. जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा ‘रिमोट’ त्यांच्या हातात होता. आता भाजपातही जिल्ह्याची पक्षसंघटना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न समोर आले आहेत. त्याबद्दल कोणी उघड विरोध केला नसला, तरी १ मे रोजी झालेल्या मंडळ अध्यक्षांच्या सत्कार समारंभाकडे दोन आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
या आठवड्यात जिल्हाध्यक्षांची निवड
भाजपाच्या प्रदेश शाखेने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी वयोमर्यादेसह काही बाबी अनिवार्य केल्या होत्या. त्यामध्ये खा.चव्हाण यांच्या समर्थकांपैकी कोणीही बसत नाही; पण निरीक्षकांमार्फत प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यातून चव्हाण समर्थकांची नावे गेली असून या आठवड्यात केव्हाही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर होईल, असे सांगण्यात आले. पक्षातर्फे आलेल्या सर्व निरीक्षकांनी चव्हाण यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.