नांदेड : भाजपाचे एक नेते आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री या नात्याने नांदेडमध्ये आलेले चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारची सायंकाळ आधी पुस्तकांच्या आणि मग विद्यार्थी परिषदेेत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहवासात घालवली. यानिमित्ताने मागील काळातील अनेक संस्मरणीय क्षणांची आठवण ताजी झाली, अशी भावना त्यांनी या भेटीवर समाजमाध्यमांतून व्यक्त केली.
‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठातील शनिवारचा दीक्षांत समारंभ आणि इतर काही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मंत्री पाटील एक दिवस आधीच शहरात आले. येथील अभंग पुस्तकालयात भरविण्यात आलेल्या विशेष ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यावी, असे पाटील यांना अमरनाथ राजूरकर, संजय कौडगे या पदाधिकार्यांनी आधीच सुचविले होते. त्यानुसार शहरात आल्यावर ते थेट ‘अभंग’मध्ये पोहोचले. प्रदर्शनातील पुस्तकांची त्यांनी पाहणी केलीच; तसेच काही पुस्तके खरेदी करून आपल्या ग्रंथसंग्रहाची माहितीही सर्वांना दिली.
त्यानंतर मंत्री पाटील विश्रामगृहामध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पण खा.अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपात आलेल्या चमूतील कोणीही तेथे हजर नव्हते. पदाधिकार्यांनी केलेले स्वागत आणि काहींसमवेतच्या चर्चा आटोपल्यानंतर पाटील यांनी विश्रामगृहातल्या सभागृहात निमंत्रित कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधला.
निमंत्रितांत प्रामुख्याने विद्यार्थी परिषदेत, संघामध्ये काम केलेल्यांचा समावेश होता. भाजपा पदाधिकारी किंवा अचानक घुसखोरी करणार्यांस वरील बैठकीत प्रवेश नव्हता. त्याचा अंदाज आल्यावर दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि अन्य कार्यकर्ते विश्रामगृहातून बाहेर पडले. सुमारे ३०/३५ उपस्थितांशी पाटील यांनी तास-सव्वातास संवाद साधला. विद्यार्थी परिषदेने दिलेल्या मूल्यांचा आणि संघटन कौशल्याचा आजच्या कार्यात खूप उपयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामान्य कुटुंबातून पढे आलेला आणि नंतर संघटनकुशल बनलेला कार्यकतार्र्, ही चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून कोल्हापूर-पुण्यात सुरू केलेल्या नव्या कामांची, वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. शक्य तेथे रचनात्मक, मानवतावादी कामे करा, चांगल्या उपक्रमांशी जोडून घ्या, असा कानमंत्र पाटील यांनी दिला. नांदेडमध्ये कोणतेही विधायक-संस्थात्मक काम उभे राहणार असेल, तर त्यास मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
वरील बैठकीस विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, सनतकुमार महाजन, सुधाकर भोयर, कृष्णा उमरीकर, डॉ.दि.भा.जोशी, डॉ.प्रशांत पेशकार, अॅड.केदार जाधव, अरुंधती पुरंदरे, कृष्णा जोशी, संजय पेकमवार, तेजोमई राऊत, नरेश दंडवते, माणिक भोसले, प्रवीण साले प्रभृती उपस्थित होते.
अभंग पुस्तकालयाच्या भेटीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिप्राय नोंदवहीत आपली पुस्तकांविषयीची भावना व्यक्त केली. त्यानंतर फेसबुक पोस्टमध्येही त्यांनी वरील भेटीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावरील पुस्तकांची प्रदर्शनात पाहणी केली. अशा प्रदर्शनांमुळे वाचनसंस्कृतीचा प्रसार होऊन समाजात प्रबोधनाचा दीप अधिक तेजाने प्रज्ज्वलित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी आलेल्या अभ्यागतांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.