Letter to Rahul Gandhi: नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नांदेडमधील कार्यकर्त्याने लक्ष वेधल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या कार्यकर्त्याचे कौतुक केले. खासदार गांधी यांनी तातडीने मराठवाड्याचा दौरा आखावा, असे आम्हीही त्यांना कळविले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
नांदेड-परभणी आणि हिंगोली या एकमेकांस लागू असलेल्या तीन जिल्ह्यांतील जलप्रलयामुळे शेती, पिके आणि शेतकर्यांची दैना झाली असून या तीन जिल्ह्यांतील गंभीर परिस्थिती पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण व इतर पाच जणांची समिती गठीत केली आहे. वरील समितीच्या नियुक्तीची प्रक्रिया काँंग्रेसच्या राज्य मुख्यालयात मंगळवारी सुरू असताना नांदेडजवळच्या बारड येथील संदीपकुमार देशमुख यांनी खा.गांधी यांना इंग्रजीतून सविस्तर पत्र पाठविल्याची बाब ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम समोर आणली. त्यानंतर राज्यातील भाजपाच्या एका मंत्र्यांकडील विशेष कार्य अधिकार्याने देशमुख यांच्या समयसूचकतेचे कौतुक केले.
मागील दीड महिन्यांपासून पाऊस आणि पुराने हाहाकार माजविल्यानंतर शासनाने आधी नांदेड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांसाठी प्रचलित धोरणानुसार मदत (भरपाई) जाहीर केली. त्यानंतर २३ तारखेला इतर जिल्ह्यांसाठीच्या मदतीचा शासन निर्णय जारी झाला, तरी त्यावर कोणीही समाधानी नाही. भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकर्यांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही येथे दिली असली, तरी राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याचे दुसर्या बाजूने सांगितले जात आहे.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शासनाला वाढीव किंवा अतिरिक्त मदत करता आली नसावी, असे अधिकार्यांकडून सांगितले जात आहे. संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या या ‘लाडक्या’ राज्याला आर्थिक मदत करू नये, हे खेदजनक असल्याचे मत खा.रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड आणि मराठवाड्यातील एकंदर स्थितीची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून घेतली असून ते अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा ठरवत होतेच; पण आता खा.राहुल गांधी यांनी दौरा करावा अशी सूचना खालच्या स्तरावरून आल्यानंतर त्यात आता सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे.
राहुल गांधी यांनी एक दिवसाचा दौरा केला, तरी डोळे मिटून बसलेल्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी काही तरी जाहीर करावे लागेल, असे सत्ताधारी गोटातच बोलले जात आहे.
काँग्रेसची समिती
नांदेड व शेजारच्या दोन जिल्ह्यांसाठी प्र्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेल्या समितीत आधी पाच जणांचा समावेश होता; पण प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नंतर त्यात संदीपकुमार देशमुख यांचे नाव समाविष्ट केले. या समितीत तुकाराम रेंगे पाटील, डॉ.प्रज्ञा राजीव सातव, बाळासाहेब देशमुख, प्रा.यशपाल भिंगे यांचा समावेश असून खा.रवींद्र चव्हाण हे समितीप्रमुख आहेत.