नांदेड : जिल्ह्याच्या काही भागातील भयंकर स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीच्या निमित्ताने राजकीय आघाडीवरील नेतृत्वहिनता ठळक झालेली असतानाच नरेंद्र मोदी सरकारच्या नागरी उड्डयन विभागाच्या यंत्रणेने (डीजीसीए) गुरुवारी या जिल्ह्यावर आणखी एक आघात करत अनिश्चित काळापर्यंत नांदेड विमानतळावरील सेवा निलंबित केल्यामुळे शुक्रवारपासून येथील विमानसेवा पूर्णतः थांबली आहे. हे विमानतळ अलीकडेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने आपल्या ताब्यात घेतले होते; पण दोन महिन्यांतच या कंपनीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
गुर-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या सुमारास नांदेड विमानतळाचा मोठा विस्तार झाला होता. रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची आणि उड्डाणाची सुविधा या विस्तारामध्ये करण्यात आली. त्यानंतर नांदेडहून मुंबई व इतर ठिकाणी विमानसेवा सुरू झाली. दरम्यानच्या काळात शासनाने हे विमानतळ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. पण या कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे त्यांना नांदेडसह इतर विमानतळांवरील व्यवस्थापन कार्यक्षमपणे करता न आल्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार अलीकडेच हे विमानतळ रिलायन्सकडून आधी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेतले आणि आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून या विमानतळाचे नियंत्रण आणि संचालन महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे देण्यात आले.
या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आणि इतर अधिकारी मधल्या काळात नांदेडला आले. संपूर्ण विमानतळाची, तेथील व्यवस्थांची आणि इतर बाबींची त्यांनी पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. रिलायन्स कंपनीने विमानतळाच्या धावपट्टीची आवश्यक ती निगा राखण्याच्या बाबतीत खबरदारी घेतली नव्हती. अलीकडच्या काळात या धावपट्टीची दुरवस्था झाल्याचे दिसून आल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ कंपनीने विमानतळावरील वेगवेगळी कामे व सुविधांसाठी राज्य शासनाकडे १२२ कोटी रूपयांची मागणी केली होती. हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे; पण नांदेड जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यात लक्ष घालून पाठपुरावा न केल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. विमानतळ कंपनीची अनास्थाही वरील कारवाईस कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.
नांदेड विमानतळावरील धावपट्टीची अवस्था अतिशय खराब असल्याच्या कारणावरून नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालक कार्यालयाने विमानतळ कंपनीच्या एका पत्रावरून नांदेड विमानतळ तूर्त बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. तसा संदेश सायंकाळनंतर येथे प्राप्त झाल्यानंतर संबंधितांत एकच खळबळ उडाली. विमानसेवा बंद ठेवावी लागणार असल्याची बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांना शुक्रवारी सकाळी कळविल्यानंतर शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. पण नांदेडहून वेगवेगळ्या शहरांना विमानाने जाणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
अलीकडच्या काळात स्टार एअरलाईन्स या कंपनीने नांदेडहून दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद इत्यादी महानगरांमध्ये जाण्यासाठी विमानसेवा सुरू ठेवली होती. ही सेवा उडाणअंतर्गत कार्यरत होती. ही सेवा अचानक थांबल्यामुळे पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी सकाळी नांदेडहून दिल्लीजवळच्या आदमपूर येथे विमान जाणार होते. या विमानासाठी आरक्षण केलेेले प्रवासी नियोजित वेळी विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानसेवा बंद झाली असल्याचे त्यांना कळाले. ही बातमी नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यातही पसरल्यानंतर अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली. जिल्हा प्रशासन शासनाशी संपर्क साधून असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.