नांदेड : नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणातील ९ आरोपींविरुद्ध सोमवारी नांदेडच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाने सुमारे १२ हजार कागदपत्रांचे दोषारोपपत्र दाखल केले.
१० फेब्रुवारी २०२५ रोजी शहरातल्या गुरुद्वारा परिसरात सकाळी ९ वाजता गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात रवींद्रसिंघ दयालसिंघ राठोड यांचा मृत्यू झाला होता, तर जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला गुरुमितसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला होता.
केवळ नांदेडच नव्हे तर अनेक राज्यातील पोलिसांना हवा असलेला कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंघ उर्फ रिंधाच्या भावाच्या हत्या प्रकरणात गुरमितसिंघ याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याचाच बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आला; पण गोळी राठोड याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात सुरुवातीला वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. दहशतवाद विरोधी पथकाने मनप्रीतसिंघ ढिल्लो, हरप्रितसिंघ कारपेंटर, दलजितसिंघ संधू, दलजितसिंघ गिल, हर्षदीप संधू, जगदीश उर्फ जग्गा, शुभदीपसिंघ व पलवीरसिंघ बाजवा या नऊ जणांना अटक केली होती. शिवाय याच प्रकरणातील आरोपी हरप्रीतसिंघ उर्फ हॅपी याला अमेरिकेत अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास नांदेड, नागपूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. सोमवारी या प्रकरणात ९ आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या २१ कलमान्वये सुमारे १२ हजार कागदपत्रांचे (२० खंड) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस उपायुक्त रामेश्वर रेंगे यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात हरविंदरसिंघ रिंधा, हरप्रितसिंघ उर्फ हॅपी गुरुदेवसिंघ व हरीसिंघ खेरा हे चौघेजण फरार घोषित करण्यात आले आहेत.
या प्रकरणात नांदेडच्या माणिक बेद्रे व त्यांच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली. एखाद्या गुन्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची जुळवाजुळव करून दोषारोपपत्र दाखल करण्याची मराठवाड्यातील पहिलीच घटना मानली जाते. तांत्रिक कौशल्य वापरून तसेच पंजाब पोलिसांची मदत घेत एटीएसने या प्रकरणात सबळ पुरावे जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.