नांदेड : नागपूर-गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी मंगळवार (दि.१५) अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथे सीमांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पिटाळून लावल्यानंतर बुधवार (दि.१६) मालेगाव येथील शेतकरी सुभाष मोरलवार यांनी या महामार्गास विरोध करत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गाला विदर्भातील काही जिल्ह्यांनी समर्थन दिले असले तरी, नांदेड जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी या विरोध होत आहे. एकीकडे हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा महामार्ग व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरु केला. मात्र दुसरीकडे अर्धापूरसह अन्य भागातील शेतकऱ्यांनी मात्र त्याला विरोध दर्शविला आहे.
अर्धापूर तालुक्यातील सुपीक व बागायती जमिनीतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे. उदरनिर्वाहाचे अन्य कुठलेही साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत मौन बाळगून असताना शेतकरी मात्र आक्रमक झाले असून अनावश्यक असलेल्या या महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. मंगळवारी भोगाव येथे सीमांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावल्यानंतर बुधवारी मालेगावलगत असलेल्या धामदरी गावात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी रेखांकन करण्यासाठी येणार असल्याची माहिती समजल्यानंतर शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी या रेखांकनाला विरोध केला त्यामुळे आजही ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
शेतकऱ्यांनी व्यवस्थेच्या विरोधात लढावे
बुधवारी मालेगाव येथील अल्पभूधारक तरूण शेतकरी सुभाष मोरलवार यांनी महामार्गलगत असलेल्या त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोरलवार यांची समजूत काढून त्यांना आत्महत्येपासून रोखले. मोरलवार हे मंगळवारपासून अस्वस्थ होते. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्यापेक्षा व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले.