नांदेडः विवाह सोहळ्यासाठी लग्नाचा मंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. पांडुरंग बट्टेवाड (वय २४), साईनाथ बट्टेवाड (वय २३), अशी मृतांची नावे असून, ते दोघेही नात्याने चुलते-पुतणे असल्याची माहिती मिळाली. तर शिवप्रसाद बट्टेवाड, असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
बोरगाव येथे रविवारी विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी सर्वच ग्रामस्थ तयारीला लागले होते. गावातील काही तरुण मंडप टाकण्याच्या तयारीत होते. मंडप टाकण्याची जबाबदारी मजुरांवर होती. रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान मंडप टाकत असताना मंडपाच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पांडुरंग बट्टेवाड (वय २४), साईनाथ बट्टेवाड (वय २३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत शिवप्रसाद बट्टेवाड हा तरुण गंभीर जखमी झाला.
जखमीला तत्काळ नांदेडच्या डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मृत पांडुरंग बट्टेवाड हा घराचा एकमेव आधार होता. त्याच्या पाच बहिणींचे लग्न लोकवर्गणीतून झाले होते.
बोरगाव येथील विद्युत तारा लोंबकळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी अनेकवेळा महावितरणकडे केल्या होत्या. परंतु त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले. संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केल्याशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. दुपारी याबाबत कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर या दोघांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला.