राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी आणि मालमत्तेचंही नुकसान झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. त्यानंतर चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संपूर्ण परिस्थितीला उद्धव ठाकरे यांचा पायगुण जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील भयावह परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न पत्रकारपरिषदेत विचारण्यात आला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे उत्तर दिलं. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.

“केवळ एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही, पण…”; नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

दुसरीकडे, चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. ”सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane blame on cm uddhav thackeray about flood situation in state rmt
First published on: 25-07-2021 at 16:30 IST