Narayan Rane criticize Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात नैतिकतेच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे. “मी नैतिकता म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, नैतिकतेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आगपाखड केली. कोकणातील केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सातारा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या नैतिकतेच्या मुद्द्यांवरून पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत उदयनराजे भोसलेही उपस्थित होते.
“२०१९ च्या निवडणुकीत हा भाजपासोबत नांदत होता. मंगळसूत्र घातलं बीजेपीचं. निवडणुकीला एकत्र लढले. निवडून आल्यावर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात पकडून गेला. ही नैतिकता आहे? नैतिकता नसलेल्या माणसाने बोलू नये”, अशी खरपूस टीका नारायण राणे यांनी ऐकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर केली.
हेही वाचा >> “मर्द असाल तर…”, नैतिकतेच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले, “आमच्या मतांवर…”
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे. येत्या तीन महिन्यांत हा निकाल लावण्याचे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. यावरून पत्रकारांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला. “कालमर्यादा अध्यक्षाला असते का?, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तसंच, “उद्धव ठाकरेंनी अभ्यास करावा. मुख्यमंत्री होता नावाला. दोन तास मंत्रालयात आला. कधीही घर सोडलं नाही. त्याला कायदे माहित नाहीत. मग अध्यक्षाला टाईम लिमिट आहे का. सर्वोच्च कोर्टात जा”, असंही नारायण राणे म्हणाले.
“नैतिकतेच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर, नारायण राणे म्हणाले की, “त्यांनी राजीनामा देऊन स्वतः मुर्खपणा केला, काल ते कबुलही केलं. आम्ही असा काही अविचार करणार नाही. २०२४ पर्यंत आमच्याकडे वेळ आहे, आम्ही सामोरे जाऊ.”
कारण यांची ताकद राहिली नाही – नारायण राणे
उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात लिहून ठेवले होते. त्यावरही नारायण राणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “शरद पवारांनी पुस्तकात काही ठेवलं नाही यांचं. तरी शरद पवारांसोबत जाणार असं ते म्हणातेहत. त्यांना कोणासोबत तरी जावंच लागेल, कारण यांची काहीच ताकद राहिली नाही”, असंही नारायण राणे म्हणाले.