डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी देशवासीयांनी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे विरोधी बाकावरील काँग्रेसने नरेंद्र मोदी सकारवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. देशातील वंचित, पीडित लोकांना न्याय मिळावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच डॉ. आंबेडकरांविषयी भाष्य करणारी एक ऑडिओ क्लीप शेअर करत त्यांनी आंबेडकरांना अभिवादन केले. संसदेच्या परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

हेही वाचा >>संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; लोकांना एकत्र येण्याचे आवाहन

द्रौपती मुर्मू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्ञानाचे प्रतिक म्हणून उल्लेख केला. तसेच प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारणी, समाजसुधारक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी काम केले. भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मूल्य आत्मसात करायला हवेत, असे मुर्मू म्हणाल्या.

तर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो, अशा भावना ओम बिर्ला यांनी व्यक्त केल्या.

भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अन्य सहकाऱ्यांसोबत भाजपाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील वंचित, पीडित लोक, महिला यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला प्रेरित करत राहील, अशा भावना नड्डा यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >> शिवसेनेचा नाशिकमध्ये महिला मेळावा, रश्मी ठाकरे यांना विनंती

तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांवर टीका केली. “लोकांना बळजबरीने शांत केले जात आहे. तसेच अँटी नॅशनल ठरवले जात आहे. यामुळे देशाची लोकशाही संपुष्टात येईल. यामुळे संविधान नष्ट होईल. नायक पूजेच्या दुष्परिणामांबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाचे भाष्य केलेले आहे. आपण लोकशाहीच्या ऱ्हासाचे समर्थन केले पाहिजे की संविधानाने घालून दिलेल्या मूल्यांचे रक्षण केले पाहिजे, हे ठरवायला हवे,” असे खरगे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या मूल्यांची स्थापना केली, त्याच मूल्यांवर आम्ही पुढे जाऊ, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकरांची शिकवण आम्हाला दिशा देईल. हीच आमची शक्ती असेल, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

सोनिया गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत देशातली जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. संविधानाची यशस्वीता ही येथील लोकांवर अवलंबून असेल. राज्यघटनेचे यश ज्या लोकांच्या हाती सत्ता दिलेली आहे, त्यांच्यावर अवलंबून आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,” असे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच भाजपा सरकार संविधानाचा गैरवापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीदेखील भाजपावर टीका केली. संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये देशातील जनतेला शिकायला मिळाली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार. आज संविधानावर, संविधानातील मूल्यांवर ठरवून हल्ला केला जात आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.