नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेसंदर्भात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. “नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

“केवळ शोक सांत्वन करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यपालांचा शोकसंदेश

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध करोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले….

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल, असं पवार यांनी म्हटलं आहे. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik oxygen tank leakage tragedy is unfortunate says cm uddhav thackeray governor and deputy cm ajit pawar scsg
First published on: 21-04-2021 at 16:51 IST