कराड : शहर व विद्यानगरला जोडणाऱ्या कृष्णा पुलावर आत्महत्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी व नदीप्रदूषण रोखण्यासाठी संरक्षक जाळी बसवण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला आहे. रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर या विभागाने सुमारे ४३ लाखांचे अंदाजपत्रक विभागीय कार्यालयाला सादर केले असल्याची माहिती सहायक कार्यकारी अभियंता पी. एस. बिराजदार यांनी दिली.
कृष्णा पुलावरून गेल्या काही वर्षांत अनेकांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या तसेच नदीत निर्माल्य टाकल्याच्या घटनांमुळे हे आत्महत्यांचे केंद्र (सुसाईड पॉईंट) म्हणून ओळखू जाऊ लागले. २८ जुलै रोजीही अशाच एका युवतीने आपले जीवन संपवल्यानंतर १२ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला होता.
या नंतर कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी पुलाची पाहणी करून लवकरच अंदाजपत्रक तयार करण्याचे आश्वासन दिले होते. यावर पुलाच्या दोन्ही बाजूंना ७ फूट उंचीची जाळी बसवण्याचा निर्णय आणि अंदाजपत्रक मनोज माळी यांना लेखी स्वरूपात देण्यात आले. त्यानंतर माळी यांनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या कामासाठी केंद्र शासनाकडून मंजुरी व निधी मिळवण्याचा पाठपुरावा होणार आहे.
कराड येथील जुना कोयना पूल हा ब्रिटीश कालीन असून, काळ्या पाषाणावर उभा आहे. त्याची उंचीही मोठी असल्याने या पुलावरून उडी टाकणारी व्यक्ती आजवर जिवंत राहिलेली तर, नव्या कृष्णा पुलाचीही उंची ज्यादाची असून, अनेकांनी या दोन्ही पुलावरून नदीमध्ये उडी घेवून आपले जीवन संपवले आहे. नव्या कृष्णा पुलावरून अलीकडेच एका युवतीने आत्महत्या केल्याने हा गंभीर प्रकार जोरदार चर्चेत आल्याने तसेच लोक या नद्यांपात्रात निर्माल्य व कचरा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याने या दोन्ही पुलाच्या दुतर्फा संरक्षित जाळी बसवून हे प्रकार रोखण्याची मागणी होत होती. आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.