Truck Cleaner Khedkar Residence: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील माजी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या आलिशान लँड क्रूझर गाडीला ट्रक घासल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली होती. यानंतर दिलीप खेडकर आणि त्यांचा वाहन चालक प्रफुल्ल साळुंके यांनी सदर ट्रक चालकाचे अपहरण करत त्याला पुण्यातील निवासस्थानी डांबून ठेवले. नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने ट्रक चालक प्रल्हाद कुमार चौहान (वय २२) याची सुटका केली. त्यानंतर प्रल्हाद कुमारने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

प्रल्हाद कुमार चौहान हा तुर्भे येथील एमआयडीसीमध्ये राहण्यास आहे. १३ सप्टेंबर रोजी मुंबई-एरोली मार्गावरील जंक्शनवर त्याच्या ट्रकने दिलीप खेडकर यांच्या गाडीला घासले. यानंतर खेडकर यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आणि ट्रक चालकाचे अपहरण केले.

पुण्यात नेल्यावर काय झाले?

प्रल्हाद कुमार चौहानने तक्रारीत म्हटले की, खेडकर आणि त्यांचा चालक साळुंकेने मला बळजबरीने त्यांच्या वाहनात बसवले. त्यानंतर माझा मोबाइल फोन काढून घेतला. पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी मला एका खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांनी मला दोन दिवस शिळे अन्न खायला दिले. तसेच माझ्या मालकाकडून ते नुकसान भरपाई मागत होते. जर पैसे मिळाले नाही तर मला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली.

रबाळे पोलिसांनी रविवारी प्रल्हादकुमार चौहानची पुण्यातील औंध येथील खेडकर कुटुंबाच्या घरातून सुटका केली. यावेळी मनोरमा दिलीप खेडकर यांनी पोलिसांना घरात येऊ दिले नाहीच शिवाय अंगावर कुत्रे सोडले. रबाळे पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करीत चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बंगल्यातील सीसीटीव्ही व्हिडीओ डिलीट केले. तसेच ट्रक चालक बंद असलेल्या खोलीची चावी दुसऱ्याला दिली.

पोलिसांनी या प्रकरणी अपहरण आणि इतर कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. आज सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांचे पथकाने तांत्रिक विष्लेशन व गोपनीय खबरीनें दिलेल्या महितीवरून संशयित आरोपी आणि खेडकर यांचा चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर सांळुखे यास धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे.