Chhagan Bhujbal On Manoj Jarange : विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष कामाला लागेल असून अनेक राजकीय नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा घेतल्या जात आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, त्यांच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीला ओबीसी समजाने विरोध केलेला आहे. यावरूनच राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

यातच मनोज जरांगे यांनी राज्यात सुरु केलेल्या जनजागृती शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला. यावेळी मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात भाष्य केलं. तसेच आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत आमदार पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला. याचवेळी मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही घणाघाती टीका केली. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम करू’, असा इशाराही मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला. त्यांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “माझा करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो, दुसरं कोणीही नाही”, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

छगन भुजबळ काय म्हणाले?

“ते (मनोज जरांगे) काय बोलले आहेत ते सोडून द्या. सध्या एवढं चांगलं वातावरण सुरु आहे, आता मॅरेथॉन (विधानसभा निवडणूक) येत आहे, त्यावर चर्चा करा. त्यांच्या विधानावर काय चर्चा करता. ते बोलले की माझा करेक्ट कार्यक्रम करणार. माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा परमेश्वर करू शकतो. दुसरं कोणीही माझा करेक्ट कार्यक्रम करू शकत नाही”, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या टप्प्यातील रॅलीचा समारोप

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांनी राज्यात जनजागृती शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यातील जिल्ह्यात पार पडला. यानंतर शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु होता. या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्पाचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला.