अहिल्यानगर : शहरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आज, गुरुवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील वीजपुरवठा बंद करून, मेणबत्ती पेटवून प्रशासनाचा निषेध केला. आठ दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला.
माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, मंगेश खताळ, संजय सपकाळ, दीपक खेडकर, सारंग पंधाडे, जॉय लोखंडे, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, आरती उफाडे, स्वप्नील ढवन, महेश गलांडे, गिरीश जगताप, राहुल कातोरे, अंकुश बोरुडे, संकेत कराड, अमोल जाधव, भगवान काटे, अभिषेक बोरुडे, परेश पुरोहित, दिनेश लंगोटे, दीपक लिपाने, संकेत झोडगे, सुरेश आडसूळ, अमित खामकर, अशोक चोभे आदी सहभागी होते. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिकांचे हाल होत आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वीच वीज गायब होते, याकडे लक्ष वेधण्यात आले.
अधीक्षक अभियंत्यांचे लेखी आश्वासन
येत्या ८ दिवसांत सर्व वीजवाहिन्यांच्या देखभालीची कामे पूर्ण करण्यात येतील. रोहित्राचे डीपी बॉक्स व त्याचे दरवाजे गरजेच्या ठिकाणी त्वरित बदलू, रस्त्यातील वीजखांब महापालिकेच्या समन्वयाने स्थलांतर करू, महावितरण कर्मचारी यांनी तोडलेल्या झाडाच्या फांद्या त्वरित उचलण्यात येतील, वाकलेले वीजपोल सरळ करण्यात येतील. अतिभारीत रोहित्राच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे रोहित्र बसवले जातील, तसेच महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही तर नियमानुसार कारवाईचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी दिले.