नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील यांना शुक्रवारच्या दौऱ्यात ताटकळत ठेवत पक्षाच्या एकमेव आमदाराने आपला ‘प्रताप’ दाखवल्यामुळे मंत्री रागावल्याची माहिती उपस्थित पदाधिकारी यांनी दिली. उशीर झाल्यामुळे पक्षाची बैठक गुंडाळण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळात सहकारमंत्री असलेले पाटील जिल्ह्यालगतच्या अहमदपूरचेच असल्यामुळे पक्षाने त्यांना संपर्कमंत्री म्हणून नियुक्त केले असून, या नात्याने त्यांचा नांदेड दौरा आधीच निश्चित झाला होता. त्यांच्या प्रमुख उपस्थितीतील बैठक पक्षाचे आमदार प्र. गो. चिखलीकर यांनी आपल्या निवासस्थानी निश्चित करताना दुपारी तीनची वेळ जाहीर केली होती.

पक्षाचे नेते भास्करराव खतगावकर यांचेही मंत्री पाटील यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी आपल्या निवासस्थानी मंत्री व इतर निमंत्रितांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. भोजन, त्यानिमित्ताने होणारी भेट आणि नंतरची बैठक याचा अंदाज घेऊन मंत्री पाटील शुक्रवारी दुपारी वेळेनुसार शहरात आले आणि खतगावकरांच्या घरी पोहोचले.

पक्षाची ही बैठक नियोजित असताना या वेळी आमदार चिखलीकर माळेगाव यात्रेच्या बैठकीमध्ये सहभागी झाले. मंत्री पाटील नांदेडमध्ये दाखल झाले, तरी चिखलीकर त्या बैठकीतच होते. खतगावकरांकडील भोजन पार पडले, तरी पक्षाच्या बैठकीचे यजमान नांदेडमध्ये आले नाहीत. मग मंत्री खतगावकरांकडे बराच वेळ थांबून पाचच्या सुमारास चिखलीकरांकडे गेले. यजमानांची वाट बघून बैठक सुरू करण्यात आली आणि त्यानंतर १५/२० मिनिटांनी चिखलीकरांचे आगमन झाले. एकंदर प्रकार पाहून मंत्री पाटील संतापले होते, असे काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीनंतर सांगितले. बराच उशीर झाल्यामुळे मंत्री पाटील यांनी बैठक आटोपती घेतली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाध्यक्ष अजित पवार यांचा नियोजित दौरा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेब पाटील आले होते. उमरी तालुक्यात गोरठेकर गटास पक्षामध्ये घेण्याचा घाट आमदार चिखलीकर यांनी घातला आहे; पण ही बाब ज्येष्ठ नेते खतगावकर तसेच त्या तालुक्यात आधीपासून पक्षाचे काम करणारे गटास सांगितली नाही. खतगावकरांच्या घरी या गटाने आपली भावना मंत्री पाटील यांच्यासमोर मांडली.

नांदेड (द.) जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्तीस खतगावकर यांनी विरोध केला होता. ते आपल्या भूमिकेवर ठाम असून, निवडणुकीच्या तोंडावर दोन नेत्यांमध्ये बेबनाव दिसत आहे. एकंदर वर्तमान मंत्री पाटील यांनी पहिल्या दौऱ्यात पाहिले; पण पक्षाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अंतर्गत बाबींवर भाष्य केले नाही. चिखलीकरांच्या उशिरा येण्याबद्दलही ते काही बोलले नाहीत. निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे बैठकीमध्ये सर्वांना सांगण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.