सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते विधान परिषदेचे आमदारही आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मनात वेगळी भूमिका होती. ऐनवेळी सचिन पाटील आले आणि आमदारही झाले. हा घड्याळाचा करिष्मा आहे. यासाठी भाजपच्या माढ्याच्या माजी खासदारांची मदत झाली. फलटण येथे स्थानिक राजकारण आहे. मात्र, रामराजेंना पक्षातून डावलण्याचा कोणताही हेतू नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
सातारा येथील पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सचिन पाटील, बाळासाहेब सोळसकर, सरचिटणीस निवास शिंदे इत्यादी उपस्थित होते.
विधान परिषदेत रामराजे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माझा आणि त्यांचा नियमित संपर्क असतो. मात्र, ते परत पक्षकार्यात येण्याविषयी चर्चा सुरू आहे, असे तटकरे यांनी सांगितले. रायगडचे पालकमंत्री पद मलाच मिळणार म्हणून भारत गोगावले धावा करतात. तसेच शिंदे सेनेचेही ज्यादा आमदार जिल्ह्यात आहेत, असे सांगण्यात येते. पालकमंत्री पदाबाबत विलंब झाला आहे, असे स्पष्ट करतानाच तटकरे म्हणाले, की मी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि त्यातच रायगड जिल्ह्यातील असल्याने माझी तटस्थ भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आमदारांची आकडेवारी मला पाठ आहे, असे सांगून त्यांनी मंत्री गोगावले यांना एक प्रकारचा टोला लगावला.
हगवणे यांचे निलंबन
राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या घरातील वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर तटकरे यांनी हगवणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, त्यांचे निलंबन झाले आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी नराधम प्रवृत्ती ठेचून काढायला हवी, असे ते म्हणाले. रूपाली चाकणकर म्हणाल्या, पक्ष कोणताही असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला पाठीशी घालणार नाही.
‘स्थानिक स्वराज्य’बाबत नेते निर्णय घेतील
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीचे तिन्ही नेते जो निर्णय घेतील त्या पद्धतीने लढवल्या जातील. आम्ही सुद्धा महायुती बरोबरच ठामपणे आहोत. याशिवाय संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासंदर्भात जी चर्चा सुरू आहे, ती केवळ चर्चाच आहे. सध्या प्रत्यक्षात तसे काही नाही, असे तटकरे म्हणाले.