गेल्या काही महिन्यांपासून आधी सत्तेत असताना आणि सरकार गेल्यानंतर भाजपावर परखड शब्दांत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कधी मिश्किल तर कधी आक्रमक शब्दांत अमोल मिटकरींनी भाजपाला लक्ष्य केलं असताना आता खुद्द अमोल मिटकरींनाच त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदारनिधीतील पैसा अमोल मिटकरींनी आपल्याच गावासाठी वळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावर आता मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं असून आरोप करणाऱ्यावरही तोंडसुख घेतलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीतील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अमोल मिटकरींबाबत तक्रारीच्या सुरात बोलत आहे. “जवळपास ५० कोटींचा निधी असला, तर त्यातले १६ कोटी त्यांच्या गावात टाकावे लागतात. आणि त्या गावाची परिस्थिती अशी आहे की ते तिथे ना ग्रामपंचायत निवडून आणू शकले, ना सोसायटी निवडून आणू शकले”, असं ही व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यातील पदाधिकारी विशाल गावंडे असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरींनी संबंधित व्यक्तीच्याच चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आरोप करणाऱ्यावर फार काही बोलू नये. तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्या व्यक्तीचं चरित्र आणि चारित्र्य सगळ्यांना माहिती आहे”, असं ते म्हणाले.

“मी जयंत पाटील, अजित पवारांना…”

“कुठलेही आरोप सिद्ध करावे लागतात. आरोप करणारा किती चारित्र्यसंपन्न आहे हेही पाहायला पाहिजे. आख्ख्या अकोला जिल्ह्याला माहिती आहे, तिथल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की अमोल मिटकरी तळागाळात जाऊन कसं काम करतात. यावर त्यांना उत्तर द्यावं, इतके ते नक्कीच पक्षासाठी मोठे नेते नाहीत. मी जयंत पाटील आणि अजित पवारांना उत्तर दिलं आहे”, असंही मिटकरी म्हणाले.

मिटकरींचे आरोपांवर सवाल

“आमदार होऊन मला अडीच वर्ष झाली. याकाळात स्थानिक आमदार विकास निधी २ कोटींवरून ३ कोटी झाला. आता तो ५ कोटी झाला आहे. आता हे म्हणतायत १६ कोटी खर्च केला. ५ कोटी गृहीत धरला, तरी दोन वर्षांचे १० कोटीच व्हायला हवेत. मग हा वरचा ६ कोटींचा आकडा कुठून काढला? माझ्या गावात फक्त ४६ लाख रुपये खर्च झाले आहेत. माझी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेत भाजपा आणि प्रहारनं शेवटच्या क्षणी युती केल्यामुळे आमचा पराभव झाला. सोसायटीमध्ये मी स्वत: इच्छुक नव्हतो”, असं स्पष्टीकरण मिटकरींनी दिलं आहे.

“आमदार झाल्यापासून हा मानसिक त्रास..”

आमदार झाल्यापासून हा मानसिक त्रास होत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. “एखादी सर्वसामान्य घरातली व्यक्ती पुढे येत असेल, त्याला आमदारकी दिली जात असेल, तर साहजिकच प्रस्थापित लोकांना पोटशूळ उठणं साहजिक आहे. आमदार झालो, तेव्हापासून मला हा मानसिक त्रास सुरू आहे. पण मी याबाबत कधीही पक्षाकडे तक्रार केली नाही, करणार नाही. कारण माझ्या पक्षाची जिल्ह्यातली प्रतिमा मला खराब करायची नाही. मोजकीच ठराविक लोकं बोलताना दिसत आहेत. माझ्या बाजूने बोलणाऱ्याला धमक्या, त्याला मारहाण करण्याचे प्रयत्न केले जातात”, असा आरोप अमोल मिटकरींनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच पत्रकार परिषद घेणार

दरम्यान, यासंदर्भात लवकरत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचं मिटकरी म्हणाले. “निधीच्या संदर्भात मला मागणीची किती पत्र त्यांनी दिली आहेत? या सगळ्याच्या मागचे बोलविते धनी कोण आहेत, हे जिल्ह्याला माहिती आहे. त्याचं नाव लवकरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे”, असं ते म्हणाले.