महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कोणतंही अधिवेशन असलं, तरी त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण नेहमीच रंगत आलं आहे. मात्र, एरवी एकमेकांवर अत्यंत आक्रमकपणे टीका करणारी नेतेमंडळी विधिमंडळात कामकाज सुरू असताना अनेकदा एकमेकांवर मिश्किल टिप्पणी देखील करताना दिसतात. यामुळे सभागृहात पिकणारा हशा एकमेकांच्या विरोधा उभ्या ठाकलेल्या या नेतेमंडळींमधल्या सौहार्दपूर्ण राजकीय संबंधांचीच साक्ष देणारा ठरतो. गुरुवारी अशाच एका चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या टोलेबाजीमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. कारण छगन भुजबळांनी त्यांच्या भाषणातून लगावलेल्या टोल्यांमधून थेट मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच हात घातला!

नेमकं घडलं काय?

विधानसभेच्या कामकाजादरम्यान आज जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेला आल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी छगन भुजबळ उभे राहिले. त्यांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला. “आपण सगळ्यांनी सांगितलं की जीएसटीचं संकलन वाढलं आहे. आत्तापर्यंत अन्नधान्यासहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे पॅकिंग अन्नदान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींवर ५ टक्के जीएसटी लागू होत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जेव्हा एखादा कर वाढवता, तेव्हा त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा

“महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री”

दरम्यान, जीएसटीसंदर्भातील आपला मुद्दा मांडण्यापूर्वी छगन भुजबळांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. समोर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना छगन भुजबळांनी त्यांच्या दाढीवर मिश्किल टिप्पणी केली. “समोर मुख्यमंत्री बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे”, असं भुजबळ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली!

“फडणवीसांचा दरारा चांगलाच वाढलाय, त्यांनी…”

दरम्यान, यावेळी छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटा काढला. “तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या ५ हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.