Sharad Pawar Having Cough : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे पुढील चार दिवसांचे त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,शरद पवारांना खोकला झाल्याने बोलण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कार्यक्रमांत त्यांना भाषण देता येत नाही. परिणामी पुढील चार दिवसांचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार राज्यातील विविध जिल्ह्यांत दौऱ्यावर आहेत. पुण्यातील दोन कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले होते, तेव्हाही अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर, काल त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंनी आगामी पालिकेच्या निवडणुकांमध्ये दिलेला स्वबळाचा नारा टोकाचा वाटत नसल्याचं ते म्हणाले. तसंच, अमित शाहांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

कोल्हापुरात शरद पवार काय म्हणाले?

महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार आमच्याकडे प्रवेश करणार आहेत, असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे केले. त्यांच्या दाव्याला उत्तर देताना पवार यांनी, सामंत हे तिकडे उद्योगातील गुंतवणूक आणण्यासाठी गेले आहेत, की पक्ष फोडायला? ते आमदार, खासदार कधी फुटतात याचीच वाट पाहतोय, अशी मिश्कील शेरेबाजी त्यांनी केल्यावर हास्य पसरले. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मीदेखील दावोसला गेलो होतो, असा उल्लेख करून पवार म्हणाले, की काल झालेल्या करारांपैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील असताना त्यांच्याशी दावोसमध्ये करार केल्याचे दिसते. इथल्याच कंपन्यांना तिकडे नेऊन करार करायचा आणि महाराष्ट्रात गुंतवणूक झाल्याचा देखावा करण्यात आला. याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र, ज्यांना गुंतवणूक करायची आहेल त्यांना महाराष्ट्रात एकत्र करायला हवे होते, असेही पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.