केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचं नेहमीच कौतुक होत असतं. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नितीन गडकरी यांचं कौतुक केलं असून त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना आलेला अनुभव देखील त्यांनी उपस्थितांना सांगितला. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचं देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केलं. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

गडकरींनी जेव्हा ही जबाबदारी घेतली…

यावेळी बोलताना शरद पवारांनी रस्त्यांचं देशाच्या विकासातील महत्व सांगितलं. रस्त्याची वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते, असं सांगतानाच यात गडकरींचा मोलाचा वाटा असल्याचं ते म्हणाले. “गडकरींनी ही जबाबदारी (रस्ते वाहतूक मंत्रालय) घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचं काम झालं होतं. गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

मला रस्त्यानं प्रवास करायला आवडतं

यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचं सांगितलं. “देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळतं. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो”, असं ते म्हणाले.

गडकरी साहेबांची कृपा…

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी इतर राज्यांमध्ये त्यांना येत असलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. “देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी पक्ष नव्हे, विकासकाम बघतात

दरम्यान, नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असं शरद पवार म्हणतात. “संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.