नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडून पुन्हा एकदा भाजपाची कास धरल्यानंतर आज (२८ जानेवारी) जनता दल (युनायटेड) आणि भाजपाचा शपथविधी संपन्न झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या राजकीय निर्णयाचे पडसाद देशभर उमटले आहेत. भाजपा आणि विरोधी पक्षांनी यावर आपापले मत नोंदविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले शरद पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्यावर मिश्किल टीका केली.
भाजपाच्या विरोधात नितीश कुमारच आघाडी करत होते
शरद पवार म्हणाले, “बिहारमध्ये जी काही राजकीय उलथा-पालथ झाली, ती अतिशय कमी दिवसांत झाली. याआधी अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. दोन तीन महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी देशातील भाजपा वगळून इतर पक्षाच्या अध्यक्षांना आणि नेत्यांना पाटणा येथे निमंत्रित केले होते. भाजपाला नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून विरोधकांनी एकजूट करावी, असे त्यांचे मत होते. पाटणा येथील बैठकीत त्यांनी एक प्रभावी भाषण केले. विरोधकांची एकजूट कशासाठी केली पाहीजे, त्याची आवश्यकता का आहे? यावरही त्यांनी त्यावेळी भाष्य केले होते. त्याप्रमाणे ते कामही करत होते. मात्र मागच्या १५ दिवसांत अचानक काय झाले? याची मला कल्पना नाही. त्यांनी त्यांची विचारधारा का सोडली, विरोधकांचे ऐक्य करत असताना ते ज्या गोष्टी सांगत होते, त्या त्यांनी अचानक का सोडल्या? याबाबत कळायला मार्ग नाही. आज त्यांनी अचानक भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.”
ही आहेत नितीश कुमार भाजपाबरोबर जाण्याची कारणे?
नितीश कुमार यांनी आया राम, गया रामलाही मागे टाकले
शरद पवार पुढे म्हणाले की, आजवर एकाच टर्ममध्ये दोन वेळा वेगवेगळ्या पक्षांबरोबर दोनदा युती करण्याचा विक्रम कुणीही केला नव्हता, तो नितीश कुमार यांनी करून दाखविला. नितीश कुमार यांनी भाजपासह निवडणूक लढविली. त्यानंतर भाजपाला सोडून लालू प्रसाद यादव यांच्यासह सरकार स्थापन केले. त्यानंतर आता पुन्हा लालू प्रसाद यादव यांना सोडून भाजपाशी संधान बांधले. मला वाटतं, अशी परिस्थिती याआधी कधीही पाहायला मिळाली नाही. पूर्वी हरियाणाचे उदाहरण दिले जायचे. तिथे “आया राम, गया राम” ही संज्ञा पहिल्यांदा वापरली गेली होती. पण हरियाणाच्या “आया राम, गया राम”लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचे मार्ग दाखवला आहे.
आज यावर मी जास्त काही बोलणार नाही. पण पुढील निवडणुकीत लोक मतदान करायला मतदान केंद्रावर जातील. तेव्हा या सर्व प्रकाराला प्रत्युत्तर देतील, असे शरद पवार यांनी सांगितले.