scorecardresearch

‘औरंगजेब क्रूर नव्हता’ आव्हाडांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “कुणी आमदार बोलला त्यावर मी…”

अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत सारवासारव करणाऱ्या शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांबाबत एका ओळीत प्रतिक्रिया दिली.

‘औरंगजेब क्रूर नव्हता’ आव्हाडांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “कुणी आमदार बोलला त्यावर मी…”
शरद पवार जितेंद्र आव्हाड (संग्रहित छायाचित्र )

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन औरंगजेब हा क्रूर किंवा हिंदूद्वेष्टा नव्हता असे सांगितले होते. ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं’ असं म्हटलं होतं. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर भाजपाच्यावतीने संतप्त प्रतिक्रिया उमटली. अजित पवार यांच्याविरोधात तर ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर जितेंद्र आव्हाड यांचाही निषेध करण्यात आला. आज शरद पवार माध्यमांना सामोरे गेले असता त्यांनाही याबाबत विचारण्यात आले. यावर शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका ओळीत प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा >> “छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…”, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबर रोजी समाप्त झाले. अजित पवारांनी शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना संभाजी महाराजांवर ते विधान केले होते. त्यानंतर नववर्षाच्या सुरुवातील अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन सुरु झाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी ३० डिसेंबरला औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल ट्विटरवर काही ऐतिहासिक दाखले देत ट्विट केले होते.

हे वाचा >> “छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…”, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

अजित पवार लवकरच माध्यमांसमोर येतील

अजित पवारांबद्दल प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय. एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही.”

आव्हाड यांच्या विधानाबाबत बोलताना म्हणाले..

मात्र जेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पाहिलेले किंवा ऐकलेले नाही. अजित पवार काय म्हणाले ही मी टीव्हीवर पाहिले. त्यामुळे त्यावर मी बोललो. कुणी आमदार बोलतात, कुणी कार्यकर्ते बोलतात त्या सगळ्यांचा उल्लेख करावा किंवा स्पष्टीकरण करावे याची मला आवश्यकता वाटत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 19:10 IST

संबंधित बातम्या