मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्याच्या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आलेले असतानाच आता हे प्रकरण थेट सायबर पोलिसांपर्यंत गेलं आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करत असल्याचे छायाचित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या प्रकरणावर सारवासारव करण्याची वेळ खासदार शिंदे यांच्यावर आली. यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळेंचा एक फोटो ट्वीट केला. मात्र आता या ट्वीटवरुन राष्ट्रवादीने थेट सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेतला असता तर…”; ठाकरेंना परवानगी मिळाल्यावर शिंदे गटाकडून दावा

‘खासदार श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा,” असा खोचक टोला लगावत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदेंचा फोटो ट्वीट केला होता. “मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू. हा कोणता राजधर्म आणि असा कसा हा धर्मवीर?” अशा आशयाचे ट्वीट वरपे यांनी केलं होतं. यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टीकरण देताना, “ते छायाचित्र मंत्रालय किंवा वर्षां निवासस्थानामधील नसून ते आमच्या घरातील कार्यालयामधील आहे,” असं म्हटलं होतं.

“याच कार्यालयातून मुख्यमंत्री आणि मी नागरिकांच्या समस्या सोडवित असतो. मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक असल्याने अधिकाऱ्यांनी याठिकाणी तात्पुरती व्यवस्था म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावाचा फलक ठेवला होता. पण या गोष्टी फुगवून ते शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांची खुर्ची असल्याचं सांगितले जात आहे,” असा दावा श्रीकांत शिंदेंनी केला.

नक्की पाहा >> ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी : निर्णयानंतर CM शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले अन्…; पाहा Video

या प्रकरणानंतर रात्री आठ वाजून सात मिनिटांनी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंनी एक फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये एका बाजूला महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि दुसऱ्या बाजूला तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे बसल्याचं दिसत आहे. या दोघांच्या खुर्च्यांमध्ये असणाऱ्या खुर्चीवर सुप्रिया सुळे असल्याचं फोटोत दिसत आहे. सुप्रिया सुळेंच्या मागे ‘महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री’ असा फलक दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, “हा फोटो बघा, कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं?” अशी कॅप्शन म्हात्रे यांनी दिली आहे.

मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा फोटो एटीडींग करुन तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दोन वेगवेगळे फोटो एकत्र करुन हा फोटो तयार करण्यात आल्याचा दावा करताना मूळ फोटो कोणते आहेत हे सुद्धा जारी केले आहे. सुप्रिया सुळेंचा फोटो हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका कार्यक्रमातील आहे.

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”

तर मंत्रिमंडळाच्या बैठकीचा मूळ फोटोमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित असल्याने त्यांची खुर्ची रिकामी ठेऊन बाजूच्या दोन खुर्च्यांवर तत्कालीन राष्ट्रवादीचे मंत्री स्थानापन्न झाले होते असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीव्ही ९ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणामध्ये खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या प्रवक्त्या असणाऱ्या शितल म्हात्रेंविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली असल्याचं वृत्त दिलं आहे.