बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून मुंडे बहीण भावात चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका? अशी टीका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. यावर प्रीतम मुंडे यांनी प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं म्हटलं आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी जाहीर आव्हानच दिलं आहे.

बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच बीड बिहार झालाय, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. यावरच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हात जोडून विनंती करतो पण जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी विनंती केली होती. त्यावर प्रीतम मुंडे यांनी ”बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे, ती तुमच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे,” असं म्हटलं होतं. त्यावर आता धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्या खासदार सात-साडे सात वर्ष काम करत आहेत. देशाच्या नेत्या म्हणून त्यांच्या वडीलभगिनी काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात रेल्वेचा डबा तयार करण्याचा कारखाना लातूरला जातो. मग कोणाचा नाकर्तेपणा?,” अशी विचारणा धनंजय मुंडेंनी केली आहे.

“तो कारखाना इथे असता तर आम्हीदेखील स्वागत केलं असतं. तुम्ही किती कर्ते आहात हे आम्हीच जगाला सांगितलं असतं. पण खासदार, मंत्री, केंद्रात सरकार असूनही इतका मोठा प्रकल्प या मागासलेल्या बीड जिल्ह्यात तुम्हाला थांबवता आला नाही आणि आम्हाला नाकर्ते म्हणता,” अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी संताप व्यक्त केला. कर्ते, नाकर्तेपणाची चर्चा एकदा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आव्हानही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण कृपा करुन जिल्ह्याला बदनाम करु नका. जिल्ह्याच्या मातीची किंमत तुम्हाला कळलेली नसली तरी आमचं त्याच्याशी इमान जोडलेलं आहे, त्याची चेष्टा करु नका,” असंही ते म्हणाले.