राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर रिपाइं (गवई) गटातर्फे २० उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार असून स्वत: अमरावतीतून रिंगणात उतरणार असल्याची माहिती रिपाइं (गवई) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटत नाहीत, असा आरोप करून संपूर्ण राज्यात २० उमेदवार राष्ट्रवादीच्या नाकात दम आणणार आहेत. भंडारा येथून पक्षाचा चांगला कार्यकर्ता उभा करून प्रफु ल्ल पटेल यांचा पराभव करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने अव्हेरल्यानंतर रिपाइं (गवई) गटाची लोकसभा निवडणुकीची भूमिका स्पष्ट करताना डॉ. गवई म्हणाले, उत्तर-पूर्व मुंबईतून पक्षातर्फे राकेश शेट्टी अथवा गुलाम हुसेन यांना उभे करण्यात येणार आहे. नागपूर व भंडारा येथे ओबीसी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या उमेदवारांची घोषणा ११ मार्चला, तर अन्य १६ उमेदवारांची घोषणा १५ मार्चला केली जाईल. प्रफुल्ल पटेल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पुतळे उभारतात, तसेच विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावही देतात, परंतु त्यांना डॉ. आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष चालत नाही. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अपमान झाल्याने येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला किंमत चुकवावी लागेल. राष्ट्रवादीला आंबेडकरी चळवळ व सामान्य नागरिक चालत नाही. त्यांना बिल्डर चालतो. आम्ही जातीय शक्तीसोबत बसणार नाही. केंद्रात भाजपसोबत जाण्याची वेळ आल्यास डॉ. राजेंद्र गवई हे आपल्यासोबत येणार नाहीत, अशी भीती वाटत असल्यानेच त्यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर न करता पक्षाचा अधिकृत उमेदवार उभा केला असेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
नागपूर महापालिका निवडणुकीत रिपाइं (गवई) गटाचे उमेदवार निवडून आले नसले तरी आघाडीला मात्र नुकसान पोचविले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना १५ हजारांहून अधिक मते मिळाल्याकडेही लक्ष वेधून हीच स्थिती येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीची होईल, असेही डॉ. गवई यांनी सांगितले. रिपाइं (गवई) लढवणाऱ्या मतदारसंघामध्ये अमरावती, नागपूर, मुंबई उत्तर-पूर्व, बुलढाणा, रावेल, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई मध्य दक्षिण, नाशिक, कोल्हापूर, हतकलंगणे, अहमदनगर, शिर्डी, भंडारा, कल्याण आणि धुळे या मतदार संघांचा समावेश असल्याचेही डॉ. गवई म्हणाले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, उपाध्यक्ष प्रा. बुद्धराज मून, नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे, वसंतराव गवई उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
राज्यात गवई गटातर्फे २० उमेदवार लढणार
राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर रिपाइं (गवई) गटातर्फे २० उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार असून स्वत: अमरावतीतून रिंगणात उतरणार असल्याची माहिती
First published on: 01-03-2014 at 02:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ditches tie up with rpis gavai faction