बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या ‘जादूच्या कांडी’चा प्रभाव दाखवत राष्ट्रवादीअंतर्गत नाराजांना गळाला लावण्यात यश मिळवले. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात माजी आमदार साहेबराव दरेकर, प्रदेश सरचिटणीस फुलचंद कराड यांना पक्षात घेतले. माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांच्यासह अन्य तीन माजी आमदार मुंडेंना अनुकूल झाले असून, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही मुंडेंना साथ द्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी उघडपणे धरला आहे. त्यामुळे एकसंघ दिसणारी राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी करण्यात मुंडेंची जादू परिणामकारक ठरू लागल्याचे दिसते.
बीड मतदारसंघात मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने सुरेश धस यांना मदानात उतरवून मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला. पण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अनेक मोहरे गळाला लावण्यात यश मिळवले. आधी फुलचंद कराड, माजलगावचे तालुकाध्यक्ष बबन सिरसाट यांच्या पाठोपाठ आष्टीचे माजी आमदार दरेकर यांचा भाजप प्रवेश झाला. माजलगावचे माजी आमदार होके पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्यात मुंडे यशस्वी झाले. बीड मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या सुशीला मोराळे यांनीही स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून मुंडेंच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
तालुका व गावपातळीवरील अनेक कार्यकत्रे फोडून मुंडे यांनी राष्ट्रवादीला खिळखिळी करण्याचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री व नेते जिल्ह्य़ात आपली प्रचंड ताकद आहे. त्यामुळे लहान कार्यकर्त्यांना विचारत नसल्याची भावना पक्षात आहे. राष्ट्रवादीचे नेते मुंडेंची बहुचर्चित कांडी निष्प्रभ झाली असून, जादू आमच्याकडे आणि कांडय़ा त्यांच्याकडे असल्याची टीका करतात. मात्र, दोनच दिवसांत मुंडेंच्या जादूने राष्ट्रवादी खिळखिळी केली आहे. धस यांच्याबरोबर असलेले पक्षाचे दोन्ही माजी आमदार मुंडेंच्या बाजूने गेले आहेत. धोंडे यांनी कार्यकर्त्यांची बठक घेऊन मते जाणून घेतली. त्यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी धस यांना विरोध करीत मुंडेंसोबत जाण्याचा आग्रह धरला. केवळ मुंडे यांच्याकडून राजकीय शब्द घेऊन निर्णय जाहीर होणार आहे.
शरद पवारांना सुमार, मुंडेंना उत्स्फूर्त प्रतिसाद!
गेवराईत राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व अमरसिंह पंडित एकत्र आल्यावर भाजपला मतदान केंद्रावर प्रतिनिधी मिळणार नाही, असे जाहीर वक्तव्य केले जात होते. मात्र, शरद पवार यांच्या सभेला मिळालेला सुमार प्रतिसाद, लोकांच्या प्रतीक्षेसाठी पवारांना दोन तास थांबावे लागले, तर दुसऱ्या बाजूला मुंडे यांच्या सभेला एकही पंडित भाजपकडून नसताना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व नियोजित वेळेपेक्षा ३ तास मुंडे उशिरा येऊनही लोकांची उपस्थिती यामुळे दोन्ही पंडितांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. गेवराईतील सभेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही मुंडेंचीच चर्चा आहे.