छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची फूस होती, असा खळबळजनक दावा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या रियाजुद्दीनने दंगलीला सुरुवात केली, असंही त्यांनी म्हटलं आहे. बोंडे म्हणाले की, राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अलिकडेच म्हटलं होतं की, महाराष्ट्रात यापुढे दंगली पेटतील. संजय राऊतांचं बोलणं खरं सिद्ध करण्यासाठीच हा सर्व प्रकार घडवून आणला.
अनिल बोंडे म्हणाले की, या दंगलीतील प्रमुख आरोपी, रियाजुद्दीन आणि मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची त्यांना फूस होती हे तपासलं पाहिजे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर केल्यानंतर शहरात अशांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हे ही वाचा >> सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांचा खून करणारा आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार; डोक्यावर होतं ‘एवढं’ बक्षीस
दंगलीमागे मोठ्या नेत्याचा हात : बोंडेंचा आरोप
बोंडे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अब्दूल कादीरला निवडणूक लढवायची आहे. त्याचा मुलगा रियाजुद्धीन नेमका त्याच दिवशी भांडण करतो, त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण होते, जलील मंदिरात आसऱ्याला जातात, तिथे तेलाचे डबे असतात, मग तिथे जाळपोळ सुरू होते. हे सर्व राष्ट्रवादीच्या नेत्याचं (अब्दूल कादीर) आणि त्याच्या मुलाचं (रियाझुद्दीन) कारस्थान आहे. परंतु या कारस्थानामागे कोणी तरी मोठ्या नेत्याचा हात आहे. बोंडे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. दरम्यान, खासदार बोंडे म्हणाले की, एकीकडे हा सर्व दंगलीचा प्रकार होतो, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. हे एवढं बोलण्यासाठी यांना दंगल भडकवावी लागते.