राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आल्याने सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांना युपीए अध्यक्ष करण्यासंबंधी झालेल्या प्रस्तावावर विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा सर्वांनी एकत्र मिळून घेण्याचा निर्णय आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी असून त्या काम करत आहेत. देशातील सर्व पक्षांचा विचार करुन त्यावेळी सोनिया गांधींना अध्यक्ष केलं होतं. एकत्रित सगळे बसल्यानंतर यावर चर्चा झाल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल”.

शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार? दिल्लीत मोठी घडामोड; पवारांसमोरच प्रस्ताव झाला संमत

“काँग्रेसचं अस्तित्व देशातील राज्यांमध्ये होतं, बऱ्याच राज्यांमध्ये आजही आहे. पण असे निर्णय कोणी वक्तव्यं करुन होत नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासहित सर्वांना एकत्रित बसून चर्चा करत युपीएची पुढील वाटचाल ठरवण्याची आवश्यकता आहे,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

नाना पटोले यांनी २०२४ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील असं ट्वीट केलं आहे. त्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “२०२४ च्या विधानसभा, लोकसभेनंतर प्रत्येक पक्षाला आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण परिस्थिती पाहूनच शेवटच्या काळात देशात आणि राज्यात पक्ष निर्णय घेतील याची खात्री आहे”.

“भाजपाच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये जातीय अँगल असतो. त्याचा फायदा राजकारणात कसा घ्यायचा याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यापलीकडे त्यांच्या मागण्यांमध्ये समाजाचं किंवा देशाचं हिंत गुंतलले नसतं हा अनुभव आहे. रामनवमी आणि गुढीपाडवा हिंदू सण असून आम्हीदेखील हिंदू आहोत. या सणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आमचा सण, सोहळा साजरा करतो तसाच आहे. यापूर्वी कोणत्याही धर्माचे सण आले तर करोना काळात मर्यादा पाळूनच ते सण साजरे करणं आवश्यक होतं. त्याचा उल्लेख आज देशभरात होत असून महाराष्ट्राचं कौतुक केलं जात आहे. पण आता परिस्थिती निवळली असून सरकारदेखील सण साजरं करण्यासंबंधी सकारात्मक आहे,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीत नेमकं काय झालं?

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखलं जाऊ शकतं असं या ठरावात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं,” असंही या ठरावात नमूद आहे.