महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि तशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखवली असल्याचे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उदघाटनाच्या (१९ जानेवारी) कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मूक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर घणाघाती टीका केली आहे. “महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की, याआधीच राज्यपालांनी पदमूक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता त्यानंतर उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे.”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

सरकार कोसळणार म्हणूनच राज्यपालांचा काढता पाय

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना अमोल मिटकरी म्हणाले की, “ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल. आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं.

chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

हे ही वाचा >> शिवसेना-वंचित युतीवरील शरद पवारांच्या प्रतिक्रियेला प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरेंसमोर प्रत्युत्तर, म्हणाले…

राष्ट्रपती कार्यालयाचा कारभार पंतप्रधान चालवतात का?

यासोबतच पंतप्रधानांकडे राज्यपाल पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दलही अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. “कायद्याप्रमाणे राज्यपालांना पदउतार व्हायचे असेल तर राष्ट्रपतींकडे अर्ज द्यायला हवा होता, पण इथे तोंडी किंवा मौखिक स्वरुपात त्यांनी पंतप्रधानांकडे शिफारस केल्याचे माध्यमातील बातम्यांमध्ये दिसत आहे. याचा अर्थ राष्ट्रपती भवनाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवतात का? अशीही शंका यानिमित्ताने येते. कुठलेही लेखी निवेदन राष्ट्रपती कार्यालयाला न देता राज्यपालांनी त्यांची महाराष्ट्र सोडण्याची इच्छा बोलून दाखवली. पण जोपर्यंत नरेंद्र मोदी ठरवत नाही, तोपर्यंत त्यांना जाता येणार नाही, याचा खुलासा राज्यपालांच्या कृतीतून झाला असल्याचे मिटकरी म्हणाले.

मला आता मनन व चिंतन करायचे आहे – राज्यपाल

दरम्यान राज्यपाल कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक काढून कोश्यारी यांच्या इच्छेबद्दल भाष्य करण्यात आले आहे. “नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.”, असे त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे माझ्याकरिता अहोभाग्य

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.