scorecardresearch

“धर्मवीर असा उल्लेख करुन संभाजी महाराजांना खुजे करु नका”, अमोल मिटकरींनी सांगितले औरंगजेबाचे ‘ते’ शेवटचे दोन प्रश्न

अजित पवार यांनी पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला होता, म्हणूनच भाजपचा पोटशूळ उठला असल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले.

“धर्मवीर असा उल्लेख करुन संभाजी महाराजांना खुजे करु नका”, अमोल मिटकरींनी सांगितले औरंगजेबाचे ‘ते’ शेवटचे दोन प्रश्न
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले विधान सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. भाजपने अजित पवारांविरोधात आज आंदोलन पुकारले असताना याबाबत अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे. अजित पवारांनी पुण्याच्या लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढला होता, म्हणूनच भाजपच्या पोटात पोटशूळ उठत आहे, अशी टीका करताना अमोल मिटकरी यांनी इतिहासाचे दाखले दिले आहेत.

एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी काहीतरी विषय असणे गरजेचे होते. अजित पवारांवर भाजपाचा आजचा पोटशूळ नाही. पुण्यातील लाल महालातून इतिहासाने ग्राह्य न धरलेले दादोजी कोंडदेव जेव्हापासून हटविले त्यावेळेपासून अजित पवारांबद्दल रोष होताच. आता तर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी उत्कृष्ट काम केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षाही सभागृहात अजित पवार प्रभावी होते. सर्व माध्यमांनी याची दखल घेतली. त्यामुळेच भाजपाच्या पोटात पोटशूळ उठला आहे.”

हे ही वाचा >> अजित पवारांच्या संभाजी महाराजांवरील वक्तव्यावर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंची टीका; म्हणाले, “निधर्मी संकल्पंना…”

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा अंतिम आठवडा प्रस्तावावर अजित पवार बोलले त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाला जाग आली आणि त्यांनी छत्रपती संभाजीमहाराजांबद्दल जे बोलले त्याचे राजकीय भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. सुंधाशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी अपमानजनक वक्तव्यांची मालिकाच चालविली. याविरोधात आज आंदोलन करणारी माकडं का बोलली नाहीत? असा प्रश्न देखील अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> “औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं”, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं

औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारताना दोन प्रश्न विचारले..

“अजित पवार बोलले ते काहीच चुकीचे नाही. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते. धर्मवीर म्हणून त्यांना खुजेपण आणू नका, असे सांगत अमोल मिटकरी यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांनी संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा दाखल दिला. जी पाचंट लोक आज आंदोलन करत आहेत त्यांना देखील प्रश्न विचारत मिटकरी म्हणाले की, औरंगजेबाच्या छावणीत संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारत असताना औरंगजेबाने त्यांना दोनच प्रश्न विचारले असा इतिहास सांगतो. एक म्हणजे स्वराज्याचा खजिना कुठे आहे? आणि दुसरा म्हणजे माझे कोण साथीदार फितूर झाले? धर्मांतराचा प्रस्ताव औरंगजेबाने ठेवला होता, अशी कुठेही नोंद नाही. आंदोलनकर्त्यांनी याबाबत पुरावा द्यावा.”, असे आव्हानही मिटकरी यांनी दिले आहे.

हे देखील वाचा >> ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

विधानसभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 17:01 IST

संबंधित बातम्या