राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असं भाकित केलं आहे. इतकच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही हे सरकार फार दिवस टिकणार नाही याचा अंदाज असल्याचं विधान त्यांनी केलंय.

नक्की वाचा >> दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

भाजपाचं गणित बसल्यानंतर शिंदे सरकार कोसळेल असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. “हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाहीच. प्रश्न एवढा आहे की हे सरकार कधी बरखास्त करायचं? भाजपाच्या कॅलक्युलेशनप्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्या दिवशी ते सरकार बरखास्त करतील. तेव्हा आपण किती मोठी चूक केली आहे, हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येईल,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच “यासंदर्भात बोलण्यात काही फार अर्थ नाही. जेव्हा होईल तेव्हा बघूयात. पण लवकरच सरकार कोसळेल. कारण अस्वस्थता बरीच आहे. जे शिवसेनेचे आमदार गेले आहेत ते नाराज आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकतं,” असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला

मुख्यमंत्री पद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. “उपमुख्यमंत्री नाराज असणे स्वाभाविक आहे. तेच मुख्यमंत्री होणार होते पण ते झाले नाहीत. याची नाराजी प्रत्यक्षात कोणी दाखवत जरी नसलं तरी मनात ती नाराजी असणारच,” असं जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या कथित नाराजीबद्दल म्हटलं आहे. तसेच राज्याचा कारभार ज्या पद्धतीने चालला आहे आणि मुख्यमंत्र्यांना ४० आमदारांसाठी जितका वेळ द्यावा लागतोय ते सुद्धा फडणवीस यांना मान्य नसेल असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. याच कारणाने फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असणार असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. “४० आमदारांची भलामण करण्यातच मुख्यमंत्री शिंदेंचा संपूर्ण वेळ जातोय. त्यामुळे मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीने राज्य चाललं आहे हे मान्य असेल असं वाटतं नाही. त्यांचा स्वभाव मला चांगला माहिती आहे,” असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काल भाजपामधील काही लोक शिंदे गटात गेल्याचं मी टीव्हीवर पाहिलं. त्यामुळे मला वाटतं की भाजपाने थोडं सावध राहिलं पाहिजे,” असा सल्लाही जयंत पाटलांनी दिला आहे. याचबरोबर, “प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की हे काही फार दिवसांचे आपले साथी नाहीत. हे कधीही जाऊ शकतात. त्यामुळे राज्यातील प्रशासनावरील पकड देखील सैल झालेली आहे,” असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.