अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ घरी नसताना सदर छापा टाकल्यामुळे कागल आणि कोल्हापूरमधील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या कागलमधील त्यांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असून त्यांनी आक्रमक होत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. काही वेळापूर्वीच स्वतः हसन मुश्रीफ यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारीत करुन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ही वाचा >> Hasan Mushrif ED Raid : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ही कारवाई ज्याप्रकारे होत आहे, ती राग येण्यासारखी गोष्ट आहे. काहीच केलेले नसतानाही वारंवार केंद्रीय यंत्रणांचा वापर कुणीतरी मुद्दामहून करत आहे, असा त्याचा अर्थ होतो. याची जाणीव झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आहे. त्याचे ते प्रदर्शन करत आहेत. तुम्ही आयकर विभागाची धाड टाकली, त्यात काहीच नाही मिळाले नाही. आता नवीनच प्रकरण काढून ईडीची धाड टाकायची, या गोष्टी लोकांना माहीत आहेत. म्हणूनच लोक त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. अशा कारवाया करणाऱ्यांनी याचा विचार केला पाहीजे.

हे ही वाचा >> Hasan Mushrif ED Raid: सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

“सत्तेत बसलेल्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल प्रचंड असूया दिसत आहे. राष्ट्रवादीच आपल्याला आव्हान देऊ शकते, अशी भावना त्यांच्यात दिसते. कारण एकामागोमाग एक राष्ट्रवादीच्याच नेत्यांना ऐनकेन प्रकारे अडकविण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यासाठी यंत्रणांचा वापर सुरु आहे. हसन मुश्रीफ यांची आतापर्यंतची कारकिर्द अतिशय पारदर्शक आणि स्पष्ट आहे. लोकांमधला नेता अशी त्यांची प्रचिती आहे. याआधी त्यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. त्याला बराच कालावधी उलटला आहे. मला वाटतं अशाप्रकारे राजकीय दृष्टीकोन ठेवून कारवाई होणं, हे भारतात, महाराष्ट्रात पुर्वी कधीच झालं नव्हतं. हा नवीन उपक्रम सुरु झालेला आहे. मात्र यंत्रणांनी अशाप्रकारे राजकीय व्यक्ती टार्गेट करुन कारवाई करणे बरोबर नाही. आज महाराष्ट्र आणि देश यंत्रणाचा कसा गैरवापर सुरु आहे, हे पाहतोय.”, असेही ते म्हणाले.

हे ही पाहा >> Hasan Mushrif on ED Raid: ‘नेमकं कोणत्या हेतूने छापा टाकण्यात आला माहीत नाही’

कारखाना चालवायला देणं म्हणजे भ्रष्टाचार नाही

अप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला देण्यात घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मुश्रीफांनी हा कारखान सोडून दोन वर्ष होऊन गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार दोन-अडीच वर्षांपुर्वी अस्तित्त्वात आली. त्याआधी कारखान्याचे टेंडर निघाले असणार. काही लोकांनी हा कारखाना चालवायला घेतल्यानंतर कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे त्या लोकांनी कारखाना सोडून दिला. कारखाने चालवायला देणे किंवा सोडणे या घटना सामान्यपणे घडत असतात. त्यात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांनी घोटाळा लपविला हे आरोप करणे म्हणजे बालिश आरोप आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होऊन बरीच वर्ष झाली आहेत. आता कोणताही व्यवहार हा भ्रष्टाचारानेच झाला आहे, असे समजणारा एक वर्ग तयार झाला असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jayant patil slams ed and state governement over hasan mushrif ed raid kvg
First published on: 11-01-2023 at 11:15 IST