अकोले : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेत्या सुनीता भांगरे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्यासह त्यांचे पुत्र राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सुनीता भांगरे या पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमित भांगरे, अपक्ष म्हणून उभे असणारे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. त्यात भांगरे यांना अल्पमतानी पराभव पत्करावा लागला होता. त्या निवडणुकीत व नंतरही अमित भांगरे यांनी आमदार डॉ. लहामटे यांच्यावर शरद पवार यांची साथ सोडल्याबद्दल सडकून टीका केली होती. तसेच आपण शरद पवार यांची साथ कधीही सोडणार नाही, असे वेळोवेळी जाहीर केले होते.

या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमित भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे हेही या वेळी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. श्रीमती सुनीता भांगरे यांचे पती दिवंगत ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.

भांगरे कुटुंब आणि विखे परिवाराचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जिल्ह्यावर सध्या मंत्री विखे यांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे सुनीता भांगरे यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता भांगरे आणि माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, अमित भांगरे भाजप प्रवेश करणार नसल्याचे समजते.

दिवंगत अशोक भांगरे यांनी विधानसभेच्या सहा निवडणुका माजी मंत्री पिचड यांचे विरुद्ध लढविल्या. त्यामुळे सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पिचड-भांगरे हे राजकीय प्रतिस्पर्धी अनेक वर्षांनंतर एकत्र दिसतील.