दहावीच्या पुस्तकात भाजपाने पक्ष आणला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजकारण करण्यात आले असून चुकीचा इतिहास दहावीच्या पुस्तकातून शिकवणार असाल तर ते खपवून घेणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा सरकारवर टीका केली. येत्या आठ दिवसात सरकारने पुस्तक बदलले नाही तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयाबाहेर पडू देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा पुणे जिल्ह्यात पोहोचली आहे. मावळमधील सभेत सुप्रिया सुळे यांनी भाजपा सरकारवर टीका केली. तुमच्या- माझ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज हे सरकार दहावीच्या विदयार्थ्यांसमोर चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एक आई आणि सुज्ञ पालक म्हणून मी आंदोलन करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची कवाडे खुली केली त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नने सन्मानित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पुणे शहरात झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोषणावर टीका केली. संसदेचे अधिवेशन चालवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने उद्या पंतप्रधानांपासून भाजपाचे सर्व खासदार लाक्षणिक उपोषणास बसणार आहे. मात्र या भाजपवाल्यांना नवरात्रमध्ये नऊ दिवस उपवास करण्याची सवय असते. आता एक दिवस उपवास केला. तर कौनसा तीर मारा, असा टोला त्यांनी लगावला.
आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले: धनंजय मुंडे</strong>
राज्यातील शेतकरी आज स्वत:चेच सरण स्वत:च रचून पेटवून घेत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करताना कर्जमाफी न करणाऱ्या सरकारला जबाबदार धरत असल्याचे चिठ्ठीत नमूद करत आहे. इतकी वाईट आणि भयावह अवस्था जनतेवर आणि शेतकऱ्यांवर आली आहे. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. परंतु आज हे घडत आहे. त्यामुळेच हे सरकार उलथवून टाकण्यासाठी सज्ज व्हा, आवाहन धनंजय मुंडे यांनी केली. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षाच्या काळ झाला .मात्र या चार वर्षांत सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतले नसून या सरकारच्या १६ मंत्र्यावर तब्बल ९० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यानी कारवाई केली नाही. या घोटाळ्यामध्ये आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुर्यावर थुंकाल तर तुमचेच तोंड पोळेल: सुनील तटकरे
सत्ताधाऱ्यांनो सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा त्यामध्ये तुमचे तोंड पोळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मावळच्या जाहीर सभेत सरकारला दिला. फसव्या आणि खोटारडया सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असून हे आंदोलन जोपर्यंत खोटारडे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा निर्धार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.