जालना : जालना जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारे माफिया ठिकठिकाणी तयार झाले असून यामध्ये प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हा अध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात निवेदन दिले.
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारांकडून अधिकाऱ्यांना धमकावणे, स्थानिक लोकांना मारहाण करणे इत्यादी प्रकार घडत आहेत. यामुळे गावांतील तरुण मुले वाममार्गास लागत असून गुन्हेगारीही वाढत आहे. त्याचप्रमाणे अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
पिकांच्या नुकसानभरपाईसाठी असलेली ई-पीक पाहणीची अट रद्द करावी, अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अधिक भावाने होणारी खत विक्री थांबवावी, खते आणि अन्य कृषी साहित्यावरील पाच टक्के वस्तू व सेवा कर काढून टाकावा, रोजगार हमी योजना कामांतील प्रलंबित देयके अदा करावीत, घरकुल बांधकामांचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर द्यावेत, पोकरा योजनेतील गैरव्यवहार आणि अनुदान वितरणाची चौकशी करावी, घाणेवाडी (संत गाडगेबाबा जलाशय) तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा आमदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
घाणेवाडी (संत गाडगेबाबा जलाशय) तलावाची दुरवस्था आणि संरक्षक भिंतीच्या विषयी तक्रारी आहेत. या अनुषंगाने असलेल्या तक्रारींच्या संदर्भात लवकरच जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. – राजेश टोपे, माजी मंत्री.