राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यात ओबीसी आरक्षणात वाटा देण्यावरून खडाजंगी चालू आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर उभय नेत्यांमधील वाद विकोपाला गेला असून जरांगे पाटील यांनी थेट मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा केली. ज्या मंडल आयोगामुळे ओबीसींना आरक्षण वाढवून मिळाले आणि ज्या ओबीसी प्रवर्गात जरांगे पाटील आरक्षण मागत आहेत, त्यालाच ते आव्हान कसे काय देऊ शकतात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट टाकून विचारला आहे.

“मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर..”, छगन भुजबळ यांचा थेट इशारा

छगन भुजबळ यांनी एक्स अकाऊंटवर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, “ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोरगरीब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यास सुरुवात होऊन राज्याच्या धोरणनिर्मितीत त्यांचा विचार होऊ लागला आणि त्यांचा विचार घेतला जाऊ लागला. त्या मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा तुम्ही करता? एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता. मागासवर्गीयांची लायकी काढता, ‘खुटा उपटण्याची’ भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे?”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “यातून दोन निष्कर्ष स्पष्टपणे काढता येतात. एक म्हणजे, ओबीसी जातींबद्दलचा तुमचा पराकोटीचा द्वेष यातून दिसतो. तुमच्या मनात या जातींबद्दल इतका द्वेष का आहे? त्यांनी तुमचं काय वाईट केलंय? दुसरं म्हणजे, तुम्हाला आता ‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते. नाहीच टिकणार! त्यामुळे ‘आम्हाला नाही तर कोणालाच नाही’, अशी तुमची भाषा येऊ लागली आहे!”

“आम्हाला आव्हान देऊ नका, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा; धनगर आरक्षणाचा उल्लेख करत म्हणाले…

“अशा संविधानविरोधी गोष्टींना या देशात थारा नाही! महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज ही दादागिरी, हा असंवैधानिक प्रयत्न नक्कीच हाणून पाडणार”, असे आव्हानच छगन भुजबळ यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ यांनी आणखी एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची गरज समजावून सांगण्यासाठी जे उदाहरण दिले होते, त्याची भुजबळ यांनी आठवण करून दिली. “दुबळे लोक बलदंड लोकांशी स्पर्धा करू शकत नाही, त्यामुळे त्यांना स्वतंत्र सुरक्षित परिस्थिती निर्माण करून द्यावी लागते. याच तत्त्वानुसार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दुर्बलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली. ही गोष्ट आजच्या काळात आरक्षणासाठी विनाकारण ओबीसींशी स्पर्धा करू पाहणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी”, अशी भावना भुजबळ यांनी या व्हिडिओसह व्यक्त केली आहे.