Rohit Pawar On Ram Shinde : राज्याच्या राजकारणात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये रोहित पवारांचा विजय झाला, तर राम शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर राम शिंदे विधानपरिषदेवर आमदार झाले आणि विधानपरिषदेचे सभापती देखील झाले.

गेल्या काही दिवसांपासून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता कर्जत नगरपंचायतीमधील काही नगरसेवक राम शिंदे यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळे अशा फोडाफोडीच्या राजकारणावरून रोहित पवार आक्रमक झाले आहेत. यावरून रोहित पवारांनी राम शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

राम शिंदे यांनी कर्जत नगर पंचायतीमधील काही नगरसेवकांबरोबर पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच या मुद्यावरून रोहित पवारांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केला. ‘फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे आता उघड झालं आहे. पण आता एकच अपेक्षा आहे की, राम शिंदे यांनी राजकारण जरूर करावं, पण घटनात्मक पदावर राहून पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही आणि मतदारसंघाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी’, अशी टीका रोहित पवार यांनी राम शिंदेंवर केली आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती ही घटनात्मक पदं असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला. पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय, अशी शंका येते. विधानपरिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं”, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत-जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज..????, एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.