राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मेळावा मागचे दोन दिवस गाजतो आहे. यातलं पहिलं कारण होतं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं भाषण आणि त्यात राम मांसाहारी होते हा केलेला उल्लेख. ज्याचे पडसाद गुरुवारी दिवसभर राज्यभरात उमटले. गुरुवारी या मेळाव्याचा दुसरा दिवस होता. मेळावा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. तसंच आमचा राम आमच्या हृदयात आहे त्याच्यावर कुणाचीही मक्तेदारी नाही असं म्हणत भाजपालाही सुनावलं आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
“प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? जनता सूज्ञ आहे. एखाद्या पक्षाने जर प्रभू श्रीरामांवर आपला अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तरीही मी हे सांगू इच्छितो की प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत. चार खांद्यावर जातानाही जय राम श्रीराम जय जय राम असं म्हटलं जातं. दोन माणसं भेटतात तेव्हा राम राम म्हणतात. माणसं जोडणारा राम भारताच्या मनात आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाहीत.” असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवार आणि भाजपा यांच्यावर टीका केली आहे.
२ जुलै २०२३ पासून राष्ट्रवादीत फूट
२ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवार यांनी ही भूमिका त्यांची नाही हे ठणकावून सांगितलं. तसंच आपण लढायला सक्षम आहोत, ज्यांना जायचं आहेत ते गेले असंही शरद पवार म्हणाले. यानंतर ५ जुलै रोजी अजित पवारांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी शरद पवारांनी त्यांचं वय पाहता आता निवृत्त व्हावं असं वक्तव्य केलं होतं. यावरुनच आता खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे. तसंच२ जुलैपासून शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिर्डी येथील मेळाव्यात अनेक नेत्यांनी भाषणं केली. त्यातलं जितेंद्र आव्हाड यांचं भाषण चर्चेत राहिलं. त्यावरही अमोल कोल्हे यांनी भूमिका मांडली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अमोल कोल्हे?
राम मांसाहारी होता या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे त्यावर फार काही बोलणं योग्य ठरणार नाही. मात्र प्रश्न हाच आहे की प्रभू श्रीरामांविषयी कुणी काय बोलायचं? हे जर काही ठराविक लोक ठरवणार असतील तर आम्ही म्हणतो की प्रभू श्रीराम आमच्या हृदयात आहेत. हृदयातल्या श्रीरामावर कुणीही मक्ता गाजवू नये अशी आमची सगळ्यांचीच भावना आहे.