राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार तुमच्या बाजुने असले तरी तुम्हाला पक्षावर दावा सांगता येणार नाही. मनसेचा एकच आमदार आहे, त्याने बंडखोरी केली तर मनसे पक्ष त्यांच्याबरोबर आहे, असं होत नाही. पक्ष संघटना राज ठाकरेंबरोबर आहे, असं वक्तव्य अजित पवार करताना व्हिडीओत दिसत आहेत.

याच व्हिडीओवरून आता अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यावर अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली.”अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं, ते एका आमदाराबद्दल होतं. पण त्याचबरोबर अजित पवार असंही बोलले होते की, संघटनेचे पदाधिकारी हे राज ठाकरेंबरोबर आहेत. महाराष्ट्रात आणि देशात ८० टक्के लोक अजित पवारांबरोबर आहेत. दोन तृतीयांशपेक्षा अधिक लोक अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनाच मिळेल,” असं सूरज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा- “अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूरज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडली नाही. पक्षात कोणतंही भांडण अथवा वाद नाही. या पक्षाची स्थापना शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी केली होती. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अगदी लहान लेकरालाही माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार… आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत.”