उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २ फेब्रुवारी) रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या दिशेने गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्कळा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक, शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई
ही सत्तेची मस्ती नाही तर काय?
माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी या घटनेचा निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्याने कुणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा व्हावी. या घटनेमागे काहीही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे?”
आपण कुठेही गोळी चालवू शकतो, असं त्यांना वाटत असेल तर हे गुंडाराज नाही तर काय? असा उद्विग्न सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांच्या आपापसातली जी काही भांडणे असतील ती त्यांनी सोडवावीत. यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जात आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार
राज्याच्या गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण उरले नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. मी ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे. याबाबत आज ट्विट करणार आहेच. त्याशिवाय अधिवेशनादरम्यान अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “आम्ही बंदुकीच्या विरोधात आहोत. इथे तर चक्क गोळीबार केला जात आहे. बंदूक सीमेवर जवानांकडे आणि पोलिसांकडे असायला हवी. आपण पोलिसांचा मानसन्मान करतो. महाराष्ट्रात पोलिसांकडे एका वेगळ्या आदराने पाहिले जाते. या देशातील सर्वात उत्कृष्ट पोलीस दल कुठले असेल तर ते महाराष्ट्रातले आहे आणि महाराष्ट्राच्याच एका पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदार गोळीबार करत असेल तर ही राज्यासाठी शरमेची बाब आहे.” दिवसाढवळ्या, कॅमेऱ्यासमोर पोलीस ठाण्यात भांडणे होतात आणि पोलिसांसमोरच गोळीबार करण्याची आमदाराची हिंमतच कशी होते. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिलाच पाहीजे, अशा मागणीचा पुनरुच्चार सुप्रिया सुळे यांनी केला.