राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून टीका केली जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. भाजपाने विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी नवनीत राणा यांना मोठा दिलासा!

दरम्यान रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रवी राणा यांच्या निमित्ताने रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं असून अप्रत्यक्षपणे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

नवनीत राणा यांच्यावरील टीकेचा संदर्भ काय

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला होता. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. तसंच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला होता.

Maharashtra Legislative Session : …म्हणून भास्कर जाधवांच्या आदेशानंतर मार्शल्सने रवी राणांना सभागृहाबाहेर काढलं

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rupali chakankar navneet rana ravi rana sgy
First published on: 07-07-2021 at 13:55 IST